'ना नफा, ना तोटा' या तत्वावर रिक्षावाल्या मामांनी केली सुरुवात अन्..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पोट भरण्यासाठी मूळ व्यवसायाला फाटा देत, बदलत्या मागणीनुसार व्यवसायात उतरलेल्या अनेकजणांच्या कहाण्या पुढे येत आहेत

लांजा : कोरोनाने अनेक जणांना आपल्या व्यवसायातसुद्धा बदल करावा लागला. पोट भरण्यासाठी मूळ व्यवसायाला फाटा देत, बदलत्या मागणीनुसार व्यवसायात उतरलेल्या अनेकजणांच्या कहाण्या पुढे येत आहेत. रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यापैकीच एक.

लॉकडाउन कालावधीत सर्व दळणवळणाची साधने ठप्प झाली. सर्वसामान्य माणसाला शहरात जाऊन भाजीपाला आणणे अशक्‍य झाले असतानाच रिक्षा व्यवसायदेखील सुरू नसल्याने संसाराची गाडी पुढे हाकायची कशी? या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी लॉकडाउन काळात गावातील वाड्यांमध्ये जाऊन भाजीविक्रीचा व्यवसाय आतापर्यंत सुरू ठेवला आणि रोजगाराची वेगळी वाट चोखाळली.

हेही वाचा - कोकणात आता या शाळांचे गेट होईल कायमचे बंद..! 

 

कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी नवीन मार्ग शोधला. शेतीच्या कामासाठी त्यांनी शासकीय पास काढला व भाजीचा व्यवसाय करायचा, असा मनाशी निश्‍चय केला. लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करत असल्याने ओळख होतीच. गावातील नागरिकांना भाजीपाल्याची सुविधा पुरवायची तयारी केली. घरपोच सेवा दिली तर ग्राहकाची गैरसोय दूर होईल, हे ताडले. शेतीचा वाहतूक पास होताच. त्यामुळे राजाराम गुरव यांनी आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला भरून वाडीवाडीमध्ये जाऊन विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

अजूनही म्हणावी तशी तालुक्‍यात एसटी सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामीण नागरिक अनेक सोईसुविधांपासून वंचित आहेत. रिक्षाने भाजीपाला आणायला लांजा येथे जाण्यापेक्षा घरपोच भाजी मिळत आहे, याला जास्त पसंती देत आहेत. गुरव यांनी हा भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा या भूमिकेतून सुरू केला आहे. सर्वसामान्यांना लांजा येथे जाऊन भाजीपाला घेऊन येणे परवडणारे नाही. तीच भाजी बाजारभावाने ते देत आहेत. आठवड्याचे दोन ते तीन दिवस भाजी विक्री करतात. 

हेही वाचा -  कृषी खात्यातील बेफिकीरीचे तण आता निघणार ; हे करणार कापणी

 

"दळणवळणाची साधने सुरळीत होत नाहीत तोपर्यंत गावातील नागरिकांची सेवा करणार. नागरिक बाजारात जाऊन गर्दी करणार व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे ओळखून घरपोच सेवा देतोय."

- राजाराम गुरव

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in lockdown period auto driver star a new business in village to village in ratnagiri