धक्कादायक ; रत्नागिरीत कौटुंबिक हिंसाचार घटनांमध्ये होतीये वाढ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

जागतिक कौटुंबिक हिंसाचार दिन अर्थात १० डिसेंबरपर्यंत हिंसाचार निर्मूलन जनजागृती पंधरवडा दिन म्हणून साजरा केला जात आहे.

चिपळूण : लॉकडाउनचा काळ महिलांसाठी घातक ठरला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या शेकडो घटना समोर आल्या आहेत. शारीरिक, मानसिक अत्याचाराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून महिला बालकल्याण विकासच्या संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी या साऱ्या केसेस हाताळल्या असून अनेकांना त्यांनी न्याय दिला आहे.

जागतिक कौटुंबिक हिंसाचार दिन अर्थात १० डिसेंबरपर्यंत हिंसाचार निर्मूलन जनजागृती पंधरवडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात महिला व बालकल्याण विकासच्या उत्तर रत्नागिरीच्या संरक्षण अधिकारी जाधव यांनी कार्यक्रमात जाधव यांनी लॉकडाउनच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि आपण यातून महिलांची सुटका कशा पद्धतीने केली याची माहिती दिली. 

हेही वाचा -  बापरे! बोरज धरणात फक्त महिनाभर पुरेल इतकेच पाणी -

जाधव म्हणाल्या, उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्‍यात त्या महिलांसाठी काम करतात. महिलांवर वाढता हिंसाचार ही चिंतेची बाब आहे. मार्च ते जून या चार महिन्याच्या लॉकडाउनच्या कालावधीत अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

एकूण ५६ केसेस आपल्याकडे आल्या. या आपण केवळ मोबाईलवर संपर्क साधून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांत ४५ केसेस माझ्याकडे आल्या होत्या. सुशिक्षित लोकही यामध्ये आहेत आणि खरंतर हेच धक्कादायक आहे. या वेळी प्रमुख उपस्थिती सभापती धनश्री शिंदे, माळी, डॉ. ज्योती यादव, डॉ. कांचन मंदार, आदिती देशपांडे, रेहान बीजले आणि महिला उपस्थित होत्या.

गरोदर महिलेची समस्या

कडक लॉकडाउनमध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला, तिला खायला नव्हे तर पिण्यालाही पाणी देत नव्हते. सतत मारहाण केली जात होती. माझ्याकडे हा विषय आला. स्वतः मी आणि पोलिसांनी तिला त्यातून बाहेर काढले आहे. तिला तिच्या माहेरी सोडले.
 

हेही वाचा - रत्नागिरीत उभारणार १०० दिवसांत ३ हजार ३१८ घरकुले -


कुटुंबाला एकत्र आणतो

मुळात अशा घटना घडल्या तर कुटुंब विस्कळीत होऊन जाते. त्यामुळेच आम्ही यामध्ये साऱ्या कुटुंबाला एकत्र आणतो. त्याच्यामध्ये असणारे समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. जास्त अत्याचार होत असले तर कायदेशीर मार्गाने न्याय देण्याचा प्रयत्न करतो. हे थांबले पाहिजे म्हणून मार्गदर्शन शिबिरे घेतो, असे जाधव यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown period the cases of domicile disputes increased in ratnagiri