esakal | खवय्यांची झाली पंचाईत; रत्नागिरीत मासे, मटणासह चिकन विक्रीवर बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

खवय्यांची झाली पंचाईत; रत्नागिरीत मासे, मटणासह चिकन विक्रीवर बंदी

खवय्यांची झाली पंचाईत; रत्नागिरीत मासे, मटणासह चिकन विक्रीवर बंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन संचारबंदीचा निर्णय घेतल्यामुळे रविवारी रत्नागिरीत शुकशुकाट होता. मेडिकल वगळता अन्य सर्वच दुकाने बंद असल्याने नागरिक घरीच होते. मासे, मटणसह चिकनी विक्री बंद ठेवल्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली. रत्नागिरीत रेल्वेस्थानकासह मारुती मंदिर येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणीचे सपाटा लावण्यात आला होता.

किराणा, भाजीपाला खरेदीचे निमित्त करुन बाहेर पडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दर दिवशी नवनवीन पावले उचलावी लागत आहेत. होम डिलीव्हरीसाठी दुकान चालकांचे नंबर त्या-त्या तालुक्‍यात जाहीर करण्यात आले आहेत. माहिती किंवा परवानगीसंदर्भात तहसीलदार, पोलिस आणि आरोग्य अधिकारी यांचेही मोबाईल नंबर नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले गेले आहेत. लोकांनी अनावश्‍यक फिरु नये, म्हणून कोरोना चाचणीवर भर दिला गेला आहे. बाहेर फिरणाऱ्यांची तत्काळ ऍण्टीजेन चाचणी केली जात आहे.

रत्नागिरी शहरात मोबाईल व्हॅनद्वारे रविवारी (18) 53 जणांच्या चाचण्या केल्या. त्यात सातजणं बाधित सापडले. तसेच मारुती मंदिर येथील तपासणी नाक्‍यावर 46 जणांपैकी 1 बाधित आढळला. महिला रुग्णालयातील कोरोना चाचणी केंद्र शिर्के प्रशालेत स्थलांतरीत केले आहे. त्याठिकाणीही स्वॅब देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यामध्ये काही व्यावसायिकांचाही समावेश होता. तालुक्‍यातून शहरात येणाऱ्यांच्या तपासणीसाठी रेल्वेस्थानकाजवळ केंद्र आहे. तिथेही अनेक जणांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी संचारबंदीचा फटका खवय्यांना बसला. मटण, चिकनसह मासे विक्री अनेक ठिकाणी बंदच होती. मिरकरवाडा जेटीवरही मासळी बाजार भरलेला नव्हता. अनेकांना मांसाहर करता आलेला नाही.

आंबा व्यावसायिकांची ओढाताण

उन्हाचा कडाका वाढला असून दुसऱ्या टप्प्यातील आंबा वेगाने तयार होत आहे; परंतु गाडीतून चारच जणांना वाहतूकीसाठी परवानगी असल्याने अडचण होत आहे. काही बागायतदारांना तपासणी केंद्रावर अडवले जात आहे. त्यामुळे आंबा काढणी काहींनी पुढे ढकलली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर आंबा झाडावरुन पडून वाया जाऊ शकतो अशी भिती बागायतदार व्यक्‍त करत आहेत. यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली असून आंबा उत्पादक संघातर्फे सोमवारी (ता. 19) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना साकडे घातले जाणार आहे.

एक नजर..

  • मटण, चिकनसह मासे विक्री अनेक ठिकाणी बंदच

  • मिरकरवाडा जेटीवरही मासळी बाजार नव्हता भरलेला

  • दुसऱ्या टप्प्यातील आंबा वेगाने होतोय तयार

  • गाडीतून चारच जणांना वाहतूकीसाठी परवानगी

  • काही बागायतदारांची तपासणी केंद्रावर अडवणूक

  • आंबा काढणी काहींनी ढकलली आता पुढे

  • आंबा उत्पादक संघ आज सामंत यांना घालणार साकडे