Loksabha 2019 : रायगड मतदारसंघात अनंत गीते विरुद्ध अनंत गीते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत पद्मा गीते या व्यक्तीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवार म्हसळा तालुक्यातील तुरंबवाडी या गावाचा रहिवाशी आहे. 2014 च्या निवडणुकीत सुनील तटकरे या नावाचा अन्य उमेदवार होता. तेव्हा सारखे नाव असल्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना तेव्हा बसला होता.

गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत पद्मा गीते या व्यक्तीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवार म्हसळा तालुक्यातील तुरंबवाडी या गावाचा रहिवाशी आहे. 2014 च्या निवडणुकीत सुनील तटकरे या नावाचा अन्य उमेदवार होता. तेव्हा सारखे नाव असल्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना तेव्हा बसला होता. 

केंद्रीय मंत्री अनंत गीते सलग नवव्यांदा लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. यापूर्वी सलग सहावेळा विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. 2014 च्या निवडणुकीत गीतेंनी सुनील तटकरेंचा केवळ 2110 मतांनी पराभव केला होता.

या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्यासारखे नाव असलेला अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता. त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. 2014 निवडणुकीत नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करण्याची नीती शिवसेनेची होती हे नंतर स्पष्ट झाले होते. 

या निवडणुकीत हीच खेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खेळल्याचे म्हटले जात आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील तुरंबवाडीसारख्या छोट्या गावातील अनंत पद्मा गीते या व्यक्तीला शोधून त्याचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे.

सदर व्यक्ती आठवी पास असून इमेलसह फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांचाही वापर करत नाही. केवळ 450 चौ. फुटाचे सामाईक घर वगळता अन्य स्थावर मालमत्ताही त्यांच्याकडे नाही. दोन बँक खात्यात प्रत्येकी 1 हजार रुपये आणि हाती शिल्लक 36 हजार रुपये वगळता जंगम मत्ता नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनीच हा उमेदवार उभा केला असल्याचे वृत्त आहे. तसेच गेल्या निवडणुकीत नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावेळी मतदारसंघातील नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तींनाही तटकरे भेटल्याचे सांगितले जाते. आता अनंत गीते या अपक्ष उमेदवाराला किती मते मिळणार. निकालावर त्याचा प्रभाव पडणार का. याची उत्सुकता आहे. मात्र त्यासाठी प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत थांबावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Anant Geete against Anant Geete in Raigad