Loksabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या भूमिकेकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

चिपळूण - कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. यापुढे कॉंग्रेसशी आपला कोणताही सबंध नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचा कल दिसून येत असून याबाबत 7 एप्रिलला निर्णय होणार आहे. याबाबत जो आदेश येईल त्या प्रमाणे काम करू, असे कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख दादा बैकर यांनी सांगितले. 

चिपळूण - कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. यापुढे कॉंग्रेसशी आपला कोणताही सबंध नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचा कल दिसून येत असून याबाबत 7 एप्रिलला निर्णय होणार आहे. याबाबत जो आदेश येईल त्या प्रमाणे काम करू, असे कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख दादा बैकर यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर कॉंग्रेसने विश्वनाथ पाटील यांना कोकण प्रभारी पद देत कोकणची जबाबदारी दिली होती. पाटील यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत दौरे करून संघटना बांधणीकडे लक्ष दिले. कॉंग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले. कुणबी सेनेचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवून त्यांनी कुणबी सेनेला कॉंग्रेस बरोबर जोडण्याचे महत्वपूर्ण काम केले.

साहजिकच कोकणात कॉंग्रेसला बळ मिळण्यास सुरवात झाली होती. त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले होते. भिवंडी मतदारसंघातून कॉंग्रेसने पाटलांना उमेदवारी नाकारत सुरेश टावरे यांना उमेदवारी दिल्याने पाटील कमालीचे नाराज झाले,परिणामी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय देखील घेतला होता. वरिष्ठ पातळीवर घडत असलेल्या घडामोडीमुळे त्यांनी काहीसे सबुरीने घेतले होते.

बुधवारी (ता.3) त्यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला.पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत कॉंग्रेसला रामराम ठोकला. तसे स्पष्ट निर्देश त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेना पदाधिकाऱ्यांना दिले. कुणबी सेना कार्यकर्त्यांनी भिवंडी मतदारसंघात कॉंग्रेसचे काम करू नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. मात्र कोकणातील निर्णय त्यांनी राखून ठेवला आहे.पाटील जो आदेश देतील त्याप्रमाणे येथे काम करू. कोकणात कुणबी सेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे कुणबी सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कुणबी सेनेने वेगळा निर्णय घेतला तर कॉंग्रेसला सर्वाधिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 
 
"आमच्या नेत्याला डावलून कॉंग्रेसने घोडचूक केली आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मात्र सध्यातरी जिल्ह्यात कोणताही निर्णय झालेला नाही. विश्वनाथ पाटलांना वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी ऑफर येत आहेत. याबाबत 7 तारखेला निर्णय होणार आहे. त्याचवेळी कोकणातील कुणबी सेनेबाबतही निर्णय होईल.'' 
- दादा बैकर,
कुणबी सेनेचे, जिल्हाप्रमुख  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Attention to Kunbi Sena role in Ratnagiri district