Loksabha 2019 : सिंधुदुर्गात आघाडीतील बिघाडी संपता संपेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कणकवली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरूवात झाली असली तरी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक गट अलीप्त असल्याचे चित्र आहे.

कणकवली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरूवात झाली असली तरी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक गट अलीप्त असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या विविध पदांवर काम करणारे माजी पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधील विद्यमान पदाधिकाऱ्यांना अजूनही विश्‍वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. मात्र संबंधीत पदाधिकारी आम्ही आघाडीसोबत आहोत असे सांगत आहेत. 

या निवडणुकीत गटातटाच्या राजकारणाने तोंड वर काढायला सुरूवात केली आहे. शिवसेना भाजप युतीतील वाद संपुष्टात आला आहे; मात्र आघाडीच्या घटक पक्षामधील अंतर्गत गटबाजी तशी संपलेली नाही. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात प्रचार बैठका घेतल्या. कुडाळ येथील बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती; मात्र त्यानंतरच्या कालावधीत दोन्ही कॉंग्रेसमध्ये एकत्र अशा बैठका अभावानेच झाल्या.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे संचालक व्हीक्‍टर डान्टस, प्रसाद रेगे, युवक राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक आदी मंडळी प्रचारापासून दूर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे.

आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांनीही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील ही गटबाजी बांदिवडेकर यांच्या मतावर परिणामकारक ठरणार आहे. या खेपेस बलाढ्य उमेदवार रिंगणात असताना आणि कॉंग्रेस आघाडीला या मतदार संघात उभे राहण्याची संधी मिळत असताना पक्षांतर्गत वाद आणि गटबाजी जैसे थे राहिल्याने आघाडीला भविष्यात पक्षीय पातळीवरील संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही गटबाजी लोकसभेबरोबर आगामी विधानसभेसाठीही मारक ठरणारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Congress NCP issue in Sindhudurg