Election Results : कोकणात गड आला पण सिंह गेला 

Election Results : कोकणात गड आला पण सिंह गेला 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या डावपेचांसमोर शिवसेनेच्या सातवेळा खासदार झालेल्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीतेंना हात टेकावे लागले. 

सलग दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत देशभर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सरशी होत असताना शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात कोणाचे डावपेच चालले, तर कोणाचे सपशेल अपयशी ठरले. नारायण राणेंविरोधातील पारंपरिक लढाई शिवसेनेने जिंकली; मात्र सुनिल तटकरेंच्या व्यूहरचनेसमोर अनंत गीते पराभूत झाले. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुळातच शिवसेनेचे वर्चस्व होते. नवा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानच्या बॅनरखाली डॉ. निलेश राणे यांनी निवडणूक लढवणे हेच मुळात आव्हान होते. गेल्यावेळी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही त्यांचा दीड लाखांनी पराभव झाला होता. यावेळी स्वाभिमानचे मूळात चिन्ह पोचवणे हेच आव्हान होते; मात्र आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता वातावरण निर्मितीसाठी स्वाभिमानने लढणे आवश्‍यक होते. 

अर्थात राणेंनी प्रचारात पूर्ण ताकद लावली. यात बरीचशी मोर्चेबांधणी आमदार नितेश राणेंनी केली. इतर पक्षातील नाराजांना जवळ करण्याचे छुपे डावपेच आखले. भाजप, राष्ट्रवादी, मनसेतील नाराज घटकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पूर्ण ताकद कामाला लावली; पण शिवसेनेची संघटनात्मक ताकद, मोदी फॅक्‍टर, शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या जनसंपर्कासमोर हे डावपेच अपयशी ठरले. 

राऊत यांचा विजय अपेक्षीत होता; पण राणेंचा इतका मोठा पराभव मात्र अनपेक्षीत होता. कारण स्वाभिमानने वातावरण निर्मिती चांगली केली होती. ती अयशस्वी ठरल्याने स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचण्याची भीती आहे. राणेंच्या शिवसेनेला विरोध आणि भाजपला पाठिंबा या भूमिकेमुळे मतदारही संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभेत ताकद दाखवण्यासाठी स्वाभिमानला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

अर्थात निलेश राणेंना मिळालेली जवळपास 2 लाख 70 हजार मते ही वैयक्‍तीक राणेंच्या करिष्म्याची आहेत. कोकणात एखाद्या व्यक्‍तीला इतका मोठा जनाधार मिळणे हे सोपे नाही. यामुळे या पराभवानंतर राणे संपले असे म्हणणे धाडसाचे ठरेल. 

रायगडमध्ये शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना तटकरेंनी पराभवाचे पाणी पाजले आहे. खर तर 2014च्या निवडणुकीतच गीतेंना निसटता विजय मिळाला होता; पण त्यांनी यातून धडा घेतला नाही. अवजड उद्योगमंत्रीपद असूनही याचा उपयोग मतदारसंघात केला नाही. पारंपरिक कुणबी मतांच्या व्होट बॅंकवर अवलंबून राहत मतदार संघातील बऱ्याच विषयांकडे दुर्लक्ष केला. उलट सुनिल तटकरे यांनी गेल्यावेळच्या सगळ्या चूका दुरूस्त केल्या. गेल्यावेळी सुनिल तटकरे याच नावाचा दुसरा उमेदवार उभा राहिल्याचा फटका त्यांना बसला होता.

यावेळी आपल्या नावचा डमी उमेदवार नसेल याची दक्षता त्यांनी घेतली. उलट अनंत गीते नावाचे तीन उमेदवार यावेळी रिंगणात होते. गेल्यावेळी स्वतंत्र लढलेल्या शेकापने 129730 मते घेतली होती. त्यांना यावेळी तटकरेंनी आपल्या सोबत घेतले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेंचे पुत्र नाविद अंतुले शिवसेनेत गेले तरी मुस्लीम मतदान त्यांच्यासमोर जावू नये यासाठीची दक्षता घेतली.

भास्कर जाधव यांच्यासारख्या पक्षांतर्गत स्पर्धकांनाही जवळ केले. गीते यांच्यावर प्रचारातून निष्क्रीयतेचा शिक्‍का मारला. गीते हे डावपेच परतवण्यात कमी पडले. दापोली, गुहागर, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, पेण या सहा विधानसभा मतदारसंघावर या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्‍यता आहे. राणेंना पराभूत करण्यात यश आले तरी पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने रायगडातील पराभव शिवसेनेसाठी विचार करायला लावणारा आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com