Loksabha Results : रत्नागिरीत विनायक राऊत यांचा एकतर्फी विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले.

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले.

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. सकाळी आठ वाजता सुरु झालेली मोजणी प्रक्रिया सायंकाळी पाचवाजेपर्यंत सुरु होती. पहिल्या फेरीत राऊत यांना 7 हजार 631 चे मताधिक्य मिळाली. पहिल्या फेरीत काॅंग्रेसचे नविनचंद्र बांदीवडेकर २२१९, शिवसेनेचे विनायक राऊत १८४८८, स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे ११५२०,  बहुजन मुक्ती पार्टी भिकुराम पालकर २२४, वंचित बहुजन आघाडी मारूती जाेशी १५८६ मते मिळाली होती. त्यानंतर शिवसेनेनं मागे पहिले नाही. शेवटपर्यंत राऊत यांचाच बोलबाला होता. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून 60 हजाराचे, चिपळूण मधून 57 हजार तर राजापुरमधून 34 हजाराचे मताधिक्य देण्यात त्या-त्या आमदारांना यश मिळाले. 

अंतिम निकाल हाती आला तेव्हा शिवसेनेचे उमेदवार राऊत यांना 4,53,369 तर निलेश राणेंना 2,76,674 मते मिळाली होती. १ लाख ७६ हजार ६९५ चे  मताधिक्य मिळाले. काँग्रेसचे नाविनचंद्र बांदिवडेकर यांना 55 हजार मते मिळाली.
 

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. कोकणचा मतदार नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतो या लोकसभा निवडणुकीतही ते सिद्ध झाले आहे. विरोधकांनी अनेक मुद्य्यांचे राजकारण करून शिवसेनेला पराभूत करण्याच्या गप्प्पा मारल्या होत्या. जनतेच्या भक्कम पाठींब्यामुळे विरोधकांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघात रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे तेथील जनताही शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली. खासदार विनायक राऊत यांचा विक्रमी मतांनी झालेल्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. 

- आमदार राजन साळवी

रमेश कदमांनी केले विरोधात काम :  नवीनचंद्र बांदिवडेकर 

राज्यासह देशामध्ये काँग्रेसची पिछेहाट झालेली दिसतेय. अजूनही काही फेऱ्या शिल्लक असल्यातरी या परिस्थितीवरून काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. राज्याचे सोडले तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात काँग्रेस आघाडी म्हणून प्रामाणिक काम झालेले नाही, जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनीच निवडणुकीत काम केलेले नाही. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला. पक्ष विरोधी काम केल्याबद्दल वरिष्ठांकडे त्याबाबतचा अहवाल गेला आहे. 

स्वाभिमानाला पूर्णविराम मिळाला : विनायक राऊत 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व कोकणचे कौटूंबिक नाते होते. या नात्यातील जिव्हाळा जपण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. गेल्या ५ वर्ष्यात आपण केलेल्या विकासात्मक कामाची पोच पावती या निवडणुकीत मला मिळाली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातूनही जनतेने आपल्याला भरभरून दिले आहे. स्वाभिमान पक्ष हा खरा राजकीय पक्ष नसून एका कुटूंबाच्या इच्छापूर्तीसाठी त्याची निर्मिती झाली होती. परंतु या निवडणुकीत स्वाभिमानाला पूर्णविराम मिळालेला आहे ,अशी परखड प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. शिवसेना विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. शिवसेना दिलेली आश्वासने पूर्ण करते असा ठाम विश्वास जनतेला आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 election result Ratnagiri Sindhudurg constituency