Election Results : पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा करिष्मा - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवल्या, त्यामुळेच हा विजय मिळाला आहे. हा सारा मोदींच्या कामाचा करिष्माच म्हणावा लागेल

रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवल्या, त्यामुळेच हा विजय मिळाला आहे. हा सारा मोदींच्या कामाचा करिष्माच म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया विजयानंतर खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. 

विजयाची खात्री होतीच. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजप आणि आमदार प्रसाद लाड, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रोत्साहन, पाठिंबा मिळाला. रत्नागिरी व सिंधुदुर्गचे पालकमंत्री, पाचही आमदार, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केलेल्या प्रचार यंत्रणेमुळे विजय सुकर झाला. 

- विनायक राऊत

सकाळी खासदार विनायक राऊत हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. विनायक राऊत यांना जास्त मते मिळून ते आघाडी घेत असल्याचे समजताच अनेक कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी  हॉटेलमध्ये जाऊन राऊत यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यास सुरवात केली. दुपारी अडीचच्या सुमारास ते एमआयडीसी येथील मतमोजणी कक्ष व शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे कार्यकर्त्यांनी राऊत यांना उचलून घेतले.

जल्लोषी वातावरणात विनायक राऊत आगे बढो, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. या वेळी म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, मंत्री दीपक केसरकर, आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सिंधुदुर्ग भाजपचे अध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पारकर यांच्यासमवेत रत्नागिरी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे व पदाधिकारी, नगरसेवक, रत्नागिरीचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 election result Vinyak Raut comment