Loksabha 2019 : सावंतवाडी तालुक्‍यात तीन ठिकाणी यंत्रात बिघाड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

सावंतवाडी - लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्‍क बजावताना तालुक्‍यात ग्रामीण भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. निरूखे, मळगाव, कुंभार्ली येथील केंद्रांवरील व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक अडथळ्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती; मात्र बिघाड दुरूस्त केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. याला कोणीही आक्षेप घेतला नाही.

सावंतवाडी - लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्‍क बजावताना तालुक्‍यात ग्रामीण भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. निरूखे, मळगाव, कुंभार्ली येथील केंद्रांवरील व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक अडथळ्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती; मात्र बिघाड दुरूस्त केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. याला कोणीही आक्षेप घेतला नाही.

दरम्यान, सकाळी अकरा नंतरच मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. एकुणच दुपारपर्यंत मतदान शांततेत पार पडले. 

कोलगाव, माडखोल, कुणकेरी, कारिवडे, सांगेली भागात पुरूषांपेक्षा महिलांचा सहभाग मोठा होता. नवमतदारांची संख्याही यावेळी जास्त होती. पहिल्यांदाच केलेल्या मतदानाबाबत त्यांच्या चेहऱ्यावर काहिसा आनंद दिसून येत होता. सकाळी सुरवातीला तासभर मतदान करण्याकडे मतदारांनी पाठ केली असली तरी आठ नंतर हळूहळू मतदान केंद्रावर गर्दी होत गेली. 

कोलगाव निरूखे पूर्ण प्राथमिक शाळा नंबर दोन येथील केद्रांत व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक अडथळा आल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. झोनल ऑफिसरने त्याठिकाणी येत दुसरी व्हिव्हिपॅट मशिन जोडून मतदान प्रक्रिया पूर्ववत केली; मात्र याला कोणीही आक्षेप घेतला नाही. बंद पडलेली व्हिव्हिपॅट मशिन सिलबंद करण्यात आल्याचे झोनल ऑफिसर एच. जी. लवांगरे यांनी सांगितले.

निरूखे पाठोपाठ मळगाव, कुंभार्ली येथेही दुपारी दीडच्या सुमारास असाच प्रकार घडला होता. त्याठिकाणीही ही मशिन बदलण्यात आल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

शासनाने मतदानासाठी सुट्टी जाहीर केल्याने टक्‍केवारीत काहीसा फरक जाणवला. मतदार आपल्या परिने उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर जाताना दिसून येत होते. वृध्द व दिव्यांगाना पकडून कार्यकर्ते मतदार केंद्रापर्यत जाण्यासाठी मदत करत होते. यावेळी पहिल्यांदाच व्हिव्हिपॅट मशिनचा वापर असल्याने ज्या उमेदवाराला आपण मतदान केले त्यालाच मतदान झाल्याची प्रत्येकाला खात्री पटल्याने निवडणुक आयोगाच्या या प्रक्रियेबाबत मतदारातून समाधान पाहायला मिळाले. कोलगाव, आंबेगाव कुणकेरी व कारिवडे येथे अकरानंतरही मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांची मोठी रांग लागली होती. मतदान जागृतीमुळे मतदारांमध्ये चांगला बदल घडून आल्याचे एकंदरित मतदानाच्या प्रतिसादामुळे दिसून आले. 

कोलगावात जादा पोलिस बंदोबस्त 
कोलगावात निरूखे येथील मदनान केंद्राबाहेर राज्य राखीव दल व पोलिस कर्मचाऱ्यांची जादा कुमक ठेवण्यात आली होती. तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात कोलगाव येत असल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जादा पोलिस बंदोबस्त असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले तर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची निगराणी होती. 

Web Title: Loksabha 2019 Faulty equipment in three places in Sawantwadi taluka