Loksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा बंदोबस्त करावा, अन्यथा माझ्याशी गाठ असेल, असा इशारा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी देवबाग येथे दिला. 

मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा बंदोबस्त करावा, अन्यथा माझ्याशी गाठ असेल, असा इशारा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी देवबाग येथे दिला. 

देवबाग येथील महापुरुष रंगमंच येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक तोडणकर, सुहास हडकर, डॉ. दीपक परब, डॉ. सदाशिव राऊळ, डॉ. भरत मणचेकर, देवानंद चिंदरकर, जीजी चोडणेकर, दीपक पाटकर, यतीन खोत, संजय लुडबे, लक्ष्मी पेडणेकर, सोनाली कोदे आदी उपस्थित होते. 

भविष्यात देवबागचा पर्यटनदृष्ट्या लखलखाट करताना समुद्रातील एलईडी मासेमारीचा लखलखाट यापुढे कायमस्वरूपी बंद करेन. त्यासाठी मच्छीमारांच्या आंदोलनाचे नेतृत्वही मीच करेन, अशी ग्वाहीही राणे यांनी दिली.

ते म्हणाले, ""बंधारा बांधायचा आमदाराला अभ्यास आहे का? पाच वर्षांत एकतरी दगड ठेवला का? देवबागचे पर्यटन बहरले. आता किती ठिकाणी बंधारे झाले? येणाऱ्या वर्षात येथील बंधाऱ्याचे काम सुरू होईल.'' 

या वेळी माजी सभापती देवानंद चिंदरकर यांनी प्रास्ताविक करताना राणेंचे देवबागसाठी मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधारी आमदार, खासदारांनी देवबागात एक रुपयाचा विकासनिधी आणला नाही. देवबागासाठी छक्के-पंजाचे राजकारण केले, असा आरोप त्यांनी केला.

विकास काय केलात? याचे उत्तरच सत्ताधाऱ्यांकडे नाही, असे डॉ. भरत मणचेकर म्हणाले. संसदेत प्रश्न मांडण्यासाठी नीलेश राणे यांना निवडून द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. राणे म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे राणे हे समीकरण आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

""मच्छीमार समाजात भांडण लावून सत्ताधारी निवडून आले. बंधारा बांधला नाही. पाच वर्षांत केवळ वल्गना केल्या. तारकर्ली देवबागात राणेंमुळे पर्यटन वाढले. तरुणांना रोजगार मिळाला. येथील वीज क्षमता कमी, रस्ता अरुंद आहे. पर्यटन व्यावसायिकांना शासनाच्या नोटिसा येत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी तारकर्ली देवबाग रस्ता कम बंधारा व्हायला पाहिजे. हे काम राणेच करू शकतात.'' 

- देवदत्त सामंत

नॉनमॅट्रिक खासदाराकडून विकासाची काय अपेक्षा? 
श्री. राणे म्हणाले, ""लोकसभेत खासदार काहीच बोलले नाहीत. मच्छीमारांची उपासमारी होऊ देणार नाही. सध्याचा खासदार नॉनमॅट्रिक असून त्याच्याकडून विकासाची काय अपेक्षा? खासदाराला संसदेत बोलायला येत नाही. हाच खासदार उद्या बेकार होणार असून तो काय नोकऱ्या देणार? खासदार द्यायचा असेल तर तो अनुभवी असावा.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Narayan Rane comment