Loksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

संगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण महायुतीसाठी एकतर्फी दिसत होते, मात्र आता चित्र बदलले असून राणेंच्या जोरदार एंट्रीने युतीतही सावध भूमिका घेतली आहे

संगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण महायुतीसाठी एकतर्फी दिसत होते, मात्र आता चित्र बदलले असून राणेंच्या जोरदार एंट्रीने युतीतही सावध भूमिका घेतली आहे. शेवटच्या दोन दिवसांत स्वाभिमान कसे धुमशान करते यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कागदोपत्री 12 उमेदवार रिंगणात असले तरी येथील मुख्य लढत शिवसेना विरुद्ध राणे अशी रंगली आहे. या रणांगणावर या लढतीचे याआधी झालेले दोन्ही सामन्यांपैकी मागीलवेळचा सामना एकतर्फी तर 2009 चा सामना रोमहर्षक झाला होता. यावेळचा तिसरा सामनाही त्यापेक्षाही अधिक रंगतदार होणार, हे निश्‍चित झाले आहे. 

मतदारसंघात जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर-लांजा असे तीन मतदारसंघ येतात. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी अर्ज भरल्यानंतर या भागातील चित्र एकतर्फी दिसत होते. गेल्या 15 दिवसांत मात्र या तीनही मतदारसंघातील वातावरण बदलले आहे. रत्नागिरी वगळता उर्वरित दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या दृष्टीने प्रचारयंत्रणा सैल दिसत असून याचाच फायदा राणेंनी उठवल्याचे बोलले जात आहे. 

नीलेश राणेंच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतः रत्नागिरी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तीनही मतदारसंघात सभांच्या माध्यमातून स्वाभिमानने केलेले शक्‍तिप्रदर्शन चर्चेचा विषय झाला आहे. एकही मोठा नेता वा राजकीयदृष्ट्या सक्षम पदाधिकारी नसतानाही स्वाभिमानची धडक हा चर्चेचा विषय झाला आहे. विशेषतः या भागातील तरुणांचा मोठा प्रतिसाद स्वाभिमानला मिळत असल्याचे सर्व सभांमधून स्पष्ट झाले आहे. 

राणेंनी कसली कंबर 
शिवसेनेच्या दृष्टीने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघ त्यांच्याच ताब्यात असले तरी अंतर्गत नाराजी, भाजपची मिळत नसेलेली पुरेशी साथ, राष्ट्रवादीने दिलेली स्वाभिमानला छुपी साथ आणि कॉंग्रेसच्या उमेदवार इकडे जास्त फिरकत नाही. या सर्वांचा फायदा उठवण्यासाठी राणेंनी जोरदार कंबर कसली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या तीनही मतदारसंघात वातावरण बदलल्याचे दिसत आहे. पुढील तीन दिवसांत या भागात कोण जोर मारणार यावर निकालाची गणिते अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Constituency