सोळा निवडणुकांत रत्नागिरीला एकदाच संधी

संदेश सप्रे
सोमवार, 1 एप्रिल 2019

संगमेश्‍वर - आजपर्यंत देशात लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, मात्र रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकांमध्ये रत्नागिरीला देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी केवळ एकदाच मिळाली. सध्या 17 व्या लोकसभेसाठी घमासान सुरू झाले आहे. या निवडणुकीतही विजयाचे प्रमुख दावेदार असलेले दोनही उमेदवार सिंधुदुर्गातील आहेत. मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्याचे पाच तालुके येऊनही रत्नागिरीला प्रतिनिधित्व कधी मिळणार असा प्रश्‍न आता जिल्हावासीयांना पडला आहे.

गेल्या 16 लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे तीनवेळा विभाजन झाले. 1951 ते 57 या काळात दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी असे दोन मतदार संघ होते. 1957 साली राजापूर आणि रत्नागिरी असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले. 2009 पर्यंत या मतदारसंघाचे अस्तित्व तसेच होते. त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत मतदारसंघ बदलला आणि तो रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रत्नागिरी-रायगड असा झाला.

1951 साली उत्तर रत्नागिरीतून मूळचे सिंधुदुर्गचे जगन्नाथ भोसले विजयी झाले तर दक्षिण रत्नागिरीतून मूळचे रत्नागिरीचे मोरेश्‍वर जोशी लोकसभेत गेले. त्यावेळी झालेल्या उमेदवार अदलाबदलीने हे शक्‍य झाले. 1957 च्या निवडणकीत राजापूर मतदारसंघातून मूळचे बेळगावचे असणाऱ्या बॅ. नाथ पै यांना संधी मिळाली. त्यावेळी रत्नागिरीचे मोरेश्‍वर जोशी पराभूत झाले. पुढे 1961 व 67 सालीही बॅ नाथ पै यांनी आपली परंपरा कायम ठेवली. 1971च्या निवडणुकीत मूळचे पुण्याचे असलेल्या मात्र कोकणशी निगडीत असलेल्या प्रा. मधु दंडवते यांना संधी मिळाली. 1977,1980,1984,1989 पर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. 1991 साली खासदार झालेले सुधीर सावंत व त्यानंतर 1996, 1998, 1999, 2004 या कालावधीत खासदार झालेले सुरेश प्रभू हे दोन्ही उमेदवार सिंधुदुर्गातीलच आहेत.

2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे विजयी उमेदवार हे सिंधुदुर्गचे नीलेश राणेच ठरले. 2014 च्या निवडणुकीत निवडून आलेले विद्यमान खासदार विनायक राऊत हे देखिल सिंधुदुर्गचेच प्रतिनिधी आहेत. 17 व्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा राणे विरुद्ध राऊत असा सिंधुदुर्गातील उमेदवारांमध्येच जंगी सामना रंगणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील नेता या मतदारसंघाचा खासदार कधी होणार असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे.

पूर्वीच्या राजापूर मतदारसंघात जिल्ह्यातील एकमेव राजापूर तालुका तिकडे होता. उर्वरित 8 तालुके उत्तर रत्नागिरीत होते. आत्ताच्या मतदार संघात चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर असे पाच तालुके समाविष्ट आहेत. राजकीय पक्षांनीही याचा विचार करणे गरजेचे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency