Loksabha 2019 : सिंधुदुर्गात शिवसेना भाजपचे गळ्यात गळे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

सिंधुदुर्गातील भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराला स्वतःहून झोकून दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

कणकवली - "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना,' असं म्हणत 40 वर्षांचा युतीचा प्रवास पुन्हा एकदा त्याच मैत्रीतून सुरू झाला आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांना सत्तेचे राजा करण्यासाठी सिंधुदुर्गातील भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराला स्वतःहून झोकून दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मागील पाच वर्षांच्या कारकीर्दीवर नाराजी व्यक्त करत, जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेगळा सूर लावला होता; मात्र पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यां आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर हा वाद संपुष्टात आला आहे.

तात्विक आणि वैचारिक व्यक्ती एकत्र येत असताना विरोधकांना संधी मिळणार नाही. याची पूर्ण खबरदारी शिवसेना आणि भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांत युतीच्या कार्यकर्त्यांमधील नाराजीचा पडदा दूर झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राऊत यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन युतीच्या पथ्यावर पडणारे आहे. 

या युतीला खिजवण्यासाठी त्यांच्या विरोधकांकडून वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात आहेत; मात्र त्याही आता फारशा प्रभावी होताना दिसत नाहीत. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांनाच पुन्हा सत्तेवर बसवायचे आहे, असा विडा उचलून युतीच्या उमेदवाराला निवडून देणे इतकेच उद्दीष्ट कार्यकर्त्यांवर बिंबवण्यात युतीच्या नेत्यांना यश येताना दिसत आहे.

उमेदवार कोणीही असो, केवळ धनुष्यबाण आणि कमळ ही निशाणी म्हणजे आपले टार्गेट निश्‍चित केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि खासदार राऊत यांच्या जिवात जीव आला आहे. 
2017च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली होती. यापूर्वीही शिवसेना-भाजप एकत्र लढत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेमध्ये अर्धा वाटा दोघांकडे असायचा; मात्र मधल्या काळात या युतीबाबत मतभेद निर्माण झाले. तोच प्रकार गेल्या पाच वर्षात सुरू राहिला. हीच स्थिती महाराष्ट्र स्वाभिमानसाठी पोषक होती. आता युतीचे मनोमिलन होऊ लागल्याने स्वाभिमानला आपल्या मोर्चे बांधणीत बदल करावा लागणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Shivsena BJP alliance in Sindhudurg