Loksabha 2019 : श्रमिक मुक्ती दलाचा नीलेश राणेंना पाठींबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

एक नजर

  • रत्नागिरी-सिंधुदुर्गचे मतदारसंघात स्वाभिमानकडून रिंगणात असलेले नीलेश राणे यांना श्रमिक मुक्ती दल संघटनेचा पाठींबा. 
  • श्रमिकचे जिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांनी दिली माहिती. 
  • कुडप, गड मध्यम प्रकल्प, गडगडी, चांदोली अभय अरण्यग्रस्त, जामदा किंवा काजिर्डा, कळसवली कोष्टे हे रत्नागिरी जिल्ह्यातील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे प्रकल्पातील संघटनांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नीलेश राणेंचे विशेष प्रयत्न.

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे मतदारसंघात स्वाभिमानकडून रिंगणात असलेले नीलेश राणे यांना श्रमिक मुक्ती दल संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. श्रमिकचे जिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली.

कुडप, गड मध्यम प्रकल्प, गडगडी, चांदोली अभय अरण्यग्रस्त, जामदा किंवा काजिर्डा, कळसवली कोष्टे हे रत्नागिरी जिल्ह्यातील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे प्रकल्पातील संघटनांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नीलेश राणेंनी विशेष प्रयत्न केले.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे प्रकल्पग्रस्त दिवस-रात्र ठाण मांडून बसले होते. सुमारे 23 दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांनी आंदोलन केले. या कालावधीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली होती. हा प्रश्‍न समजल्यानंतर नीलेश राणेंनी भेट दिली. चोविस तासाच्या आत हा प्रश्‍न खासदार नारायण राणेंमार्फत मुख्यमंत्र्यांपुढे मांडून सोडवू, असे आश्‍वासन दिले.

त्यानंतर त्यांचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली होती. त्यानंतर स्वाभिमानचे सरचिटणीस आणि उमेदवार नीलेश यांना श्रमिक मुक्ती दलाने बहुमताने पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले. भविष्यात त्यांच्या प्रश्‍नासाठी लढा देण्यासाठी राणे यांच्याकडून पाठबळ मिळणार आहे. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी हा निर्णय पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.

श्रमिकचे प्रतिनिधी अरुण कदम, चंद्रकांत शिंदे, कृष्णा शिंदे, कृष्णा निमणकर, सुरेश खानविलकर, सुभाष शिर्के, कोंडीबा पवार, नजीर चौगुले, प्रवीण गायकवाड, मोहन गायकवाड, सुरेष पवार यांनी देखील पाठिंबा दिला असून प्रचार करण्यास सुरुवात केल्याचे दिलिप गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Shramik Mukti Dal will support Nilesh Rane