Loksabha 2019 : कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणणार - ठाकरे

Loksabha 2019 :  कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणणार - ठाकरे

कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे पर्यावरण अबाधित ठेवणारे उद्योग आणायचे आहेत. निवडणुकीनंतर प्रत्यक्षात अंमलबजावणीही होईल. पण, येथे रोजगार मिळाला म्हणून मुंबईशी असलेलं नातं तोडायचं नाही, असं वचनही श्री. ठाकरे यांनी या सभेत शिवसैनिकांकडून घेतले.

कोकणात पुन्हा गुंडगिरी केलीत तर शिवसैनिक आणि येथील जनता गप्प बसणार नाही, असा इशारा श्री. ठाकरे यांनी दिला. मागील वेळेस आमदार वैभव नाईक तुमच्याशी एकटा लढला होता, हे लक्षात ठेवा. कोकणचा विकास तुम्हीच केलात तर पडलात का? असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

शिवसेनेमुळेच एलईडी फिशिंगला पायबंद
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘‘कोकण किनारपट्टीवर एलईडी फिशिंगने उच्छाद मांडला. ही तक्रार इथल्या मच्छीमारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली; तर श्री. ठाकरे यांनी देशाचे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर तातडीने एलईडी फिशिंगवर कारवाई झाली आहे. दरम्यान, पुढील काळात आडाळी एमआयडीसीमध्ये गोव्यातील मोठे उद्योग येणार आहेत. यातून सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.’’

श्री. ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली युती, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा काँग्रेस पक्षाने केलेला अपमान, मोदींना हटविण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी केलेल्या आघाडीची खिचडी, काश्‍मीरमधील ३७० कलम वगळणे, राममंदिर उभारणी आणि पाकिस्तानचा संपूर्ण नायनाट याबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन केले.

 ‘‘कोकणच्या विकासाचा मास्टर प्लॅन आम्ही तयार केलाय. पुढील काही दिवसांत कोकणात मासे आणि फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग येतील. त्याबाबत इतर देशांशी आमची बोलणी झाली आहे. ते येथे कारखाने टाकणार आहेत. या उद्योगांमुळे येथील प्रत्येक कुटुंबाला रोजगाराचे साधन मिळेल. आतापर्यंत कोकणात येणारी सुबत्ता घाटाने अडवली होती. मात्र, कोल्हापूर-वैभववाडी ते विजयदुर्ग रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर तेथील कारखान्यातील माल विदेशात जाईल आणि विकासाची गंगा कोकणातही येईल.’’

- सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री

शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, ‘‘आमचा पाच वर्षांचा कारभार आणि विरोधकांचा गेल्या २० वर्षांचा कारभार पाहिला तर आम्ही विकास करून दाखविला, हेच चित्र समोर येईल. शास्त्री नदीवरील पूल आम्ही एक वर्षात पूर्ण केला; तर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणही चार वर्षांत पूर्ण होतंय. याखेरीज रेल्वे दुपदरीकरण, विद्युतीकरण आम्हीच करू शकतो, हेही दाखवून दिलंय.’’

‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत येथील वाईट संस्कृती हद्दपार केली होती. मात्र, या राडा संस्कृतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथील मतदार राडा संस्कृतीला पुन्हा एकदा धडा शिकवणार आहेत.’’

- विनायक राऊत, खासदार

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘विकासनिधीबाबत राणेंनी उगाच गमज्या मारू नयेत. त्यांच्या चौपट, पाचपट निधी आम्ही गेल्या पाच वर्षांत आणलाय. रस्त्यांसाठी त्यांनी ३१७ कोटी, तर आम्ही एक हजार ३८७ कोटी, जिल्हा नियोजनमध्ये त्यांनी २५ कोटी, तर आम्ही १०० कोटी, जिल्हा परिषद शाळांसाठी त्यांनी सात कोटी, तर आम्ही ३२ कोटी निधी आणला. मच्छीमारांसाठी राणेंनी २५ कोटी, तर आम्ही २६६ कोटी रुपये आणले.’’

शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची सभा उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात झाली. यात श्री. ठाकरे यांनी प्रमुख भाषण केले; तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, खासदार विनायक राऊत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, गौरीशंकर खोत यांनीही विचार मांडले. त्यांच्याबरोबर आमदार वैभव नाईक, आमदार उदय सामंत, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम सावंत-पालव,  अरुण दुधवडकर, अतुल काळसेकर व शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com