LokSabha 2019 : स्वाभिमानला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 March 2019

चिपळूण - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसैन दलवाई यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, राष्ट्रवादीचा स्वाभिमानला छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

चिपळूण - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसैन दलवाई यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, राष्ट्रवादीचा स्वाभिमानला छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला राष्ट्रवादीकडून दगा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना - भाजपची युती झाल्यानंतर खासदार नारायण राणेंना आघाडीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राणेंच्या भेटीनंतर या चर्चेला जोर आला होता. मात्र, कॉंग्रेस आघाडीच्या जागा वाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कॉंग्रेसकडे आहे. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडून राणेंना पाठिंबा देणे शक्‍य नसल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीने घ्यावी व राणेंना अधिकृत पाठिंबा द्यावा, अशा हालचाली सुरू होत्या. परंतु रत्नागिरीची जागा घेताना राष्ट्रवादीला राज्यातील अन्य एका मतदारसंघावर पाणी सोडावे लागले असते.

या मतदारसंघासाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. नारायण राणेंनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांचा छुपा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानचे काम केल्यास काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर खासदार हुसैन दलवाई जिल्हा दौऱ्यावर आले होते.  काँग्रेस विरोधी काम करणाऱ्यांचा प्रचार करू नका, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी आघाडीचा धर्म पाळण्याची सूचना पत्रकार परिषदेतून दिली. दलवाईंची सूचना कितीजण मनावर घेऊन काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. 

" काँग्रेसविरोधी बोलणारे व काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्या पक्षाला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा मतदार आहे. निवडणुकीच्या मतदानातून ते स्पष्ट होईल.'' 
- हुसैन दलवाई,
खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Ratnagiri Sindhudurg Constituency special