लोटे उद्योजकांचे २८ जूनला आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा समस्येवर २८ जूनला आंदोलन छेडण्याचा निर्णय लोटे उद्योजक संघटनेने घेतला आहे. 

या औद्योगिक वसाहतीत बहुतांशी निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत.अनेक कंपन्यांच्या उत्पादनाचा परिणाम रोजगार निर्मितीवर व शासनाच्या विविध प्रकारच्या करांवर होत आहे.वालोपे येथून लोटे परशुरामला पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणी जुनी फरशी होती. त्यामुळे पाणी अडवले जात होते.

पंपिंग करायला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत होता. ही फरशी आंदोलन करून तोडल्याने लोटे परशुराम, खेर्डी, दाभोळ वीज प्रकल्प आणि चिपळूण पालिकेच्या पंप हाऊसजवळ पाणीसाठा उपलब्ध नसतो. येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधावा, अशी मागणी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केली आहे. उद्योजकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही.

पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्‍नांवर नुकतीच उद्योग भवन, लोटे येथे संघटनेची सभा झाली. सभेत उद्योजकांनी संताप व्यक्त केला. उद्योजक संघटनेने याविरुद्ध आंदोलन छेडण्याचे ठरवले आहे.  २८ जूनला जमावबंदी आदेश संपुष्टात आल्यावर उद्योजक आक्रमकपणे आंदोलन करणार आहेत.

यावेळी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, जनरल सेक्रेटरी राज आंब्रे, संचालक मिलिंद बारटक्के, शिरीष चौधरी, कुंदन मोरे, संजय घाग, विश्वास जोशी, संगीता ओतारी, संस्थापक अध्यक्ष सुनील शिर्के आणि सुमारे ४५ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दप्तरदिरंगाईत प्रस्ताव अडकला 
जिल्हाधिकारी, उद्योगमंत्री, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उद्योजक संघटना पाठपुरावा करीत आहे. महामंडळ पाहिजे त्या प्रमाणात या विषयात लक्ष घालत नाही. दप्तरदिरंगाईत सदर प्रस्तावाची फाइल वरखाली होत आहे. उद्योगमंत्र्यांनी आश्वासन देऊनही प्रस्तावाला गती मिळाली नाही. यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lote Entrepreneurs agitation on 28th June