लोटेतील प्रदूषण न थांबल्यास आंदोलन; ग्रामस्थ सीईटीपीवर धडकले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

सीईटीपीलगतच्या नाल्यातून रसायनमिश्रीत पाणी कोतवलीच्या नदीत येते. या पाण्यामुळे नदीतील जलचर धोक्‍यात आले आहे. जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्रोत धोक्‍यात आल्यामुळे गुरांच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

चिपळूण ( रत्नागिरी ) - लोटेतील जल प्रदूषणाच्या मुद्यावर असगिणी, कोतवली आणि घाणेखुंट गावातील ग्रामस्थ आज सीईटीपीवर धडकले. सीईटीपीलगतच्या नाल्यात प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जलप्रदुषणात वाढ झाली आहे. हे पाणी न थांबल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा कोतवलीचे माजी सरपंच संदीप आंब्रे यांनी सीईटीपीच्या अधिकाऱ्यांना दिला. 

सीईटीपीलगतच्या नाल्यातून रसायनमिश्रीत पाणी कोतवलीच्या नदीत येते. या पाण्यामुळे नदीतील जलचर धोक्‍यात आले आहे. जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्रोत धोक्‍यात आल्यामुळे गुरांच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. हे पाणी पुढे दाभोळ खाडीला मिळत असल्यामुळे दाभोळ खाडीत मिळणाऱ्या दुर्मिळ माशांची संख्याही कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी टॅंकरमधून आणलेला रसायनमिश्रीत पाणी लोटे परिसरात सोडत असताना असगिणीतील ग्रामस्थांनी टॅंकर चालकाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

सीईटीपीलगतच्या नाल्यातूनही रसायनमिश्रीत पाणी येत असल्यामुळे हे पाणी सीईटीपीतून प्रक्रिया न करता सोडले जात असावे असा संशय घेत परिसरातील नागरिकांनी आज सीईटीपीवर धडक दिली. संदीप आंब्रे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सरपंच श्रद्धा जाधव, सुरेश भांडवकर, विश्वनाथ आंब्रे, बानू खान संजय बेडेकर, अशोक मोरे आदी उपस्थित होते. सीईटीपीचे पर्यवेक्षक संतोष अहिर यांना त्यांनी जाब विचारला. 

अहिर म्हणाले, लोटेत 216 कारखानदार आहेत. यातील 76 कारखानदार सीईटीपीत आपले रसायनमिश्रीत पाणी सोडतात. त्या पाण्यावर सीईटीपी प्रक्रिया केली जाते. नंतरच ते पाणी जलवाहिनीद्वारे सोडले जाते. काही कंपन्या प्रक्रिया न करता थेट नाल्यात पाणी सोडतात आणि आरोप सीईटीपीवर होतो. कोतवलीच्या नाल्यात रसायनमिश्रीत पाणी सोडले जाऊ नये यासाठी आम्ही तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

सीईटीपीच्या संदर्भात लोटे परिसरातील ग्रामस्थांच्या शंका, मागण्या व समस्या आम्ही सीईटीपीचे अध्यक्ष सतीश वाघ यांच्याकडे मांडल्या आहेत. लवकरात लवकर स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. सीईटीपीतून दूषित पाण्याचा एक थेंबही सोडला जाणार नाही याची दक्षता आम्ही घेवू. 
- संतोष अहिर, पर्यवेक्षक सीईटीपी 

लोटेतील जलप्रदूषणाला एमपीसीबीही जबाबदार आहे. अधिकारी दुलर्क्ष करीत असल्यामुळे कारखानदारांचे फावले. रात्री-अपरात्री रसायनमिश्रित पाणी सोडण्याचे प्रकार वाढलेत. आम्ही ते निदर्शनास आणून दिल्यावर पोलिस आम्हालाच दमदाटी करतात. जलप्रदूषण थांबले नाही तर कारखानदारी बंद करू. 
- संदीप आंब्रे, कोतवली  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lote Villagers Agitation Hint On Pollution Issue