कोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठास चालना - महादेव जानकर

मकरंद पटवर्धन 
मंगळवार, 10 जुलै 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

‘मासे कोकणात विद्यापीठ नागपुरात’ अशी बातमी काही महिन्यांपूर्वी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोकणात हवे, अशी आग्रही मागणी त्यात मांडली होती. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुढे आला आणि कोकणातले आमदार आक्रमक झाले. सर्वपक्षीय आमदारांनी या मागणीला पाठिंबा दिला. अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेवेळी कोकणात विद्यापीठ सुरू करण्याचे विधेयक आणण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, भास्कर जाधव यांनी या मागणीला पाठिंबा दिला. भास्कर जाधव या मागणीसाठी आक्रमक झाले व धडाडीने मुद्दे मांडले.

स्वतंत्र विद्यापीठ सुरू झाल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना अ‍ॅक्वाकल्चर, मत्स्य प्रक्रिया उद्योगासह विविध विषयांचे अभ्यासक्रम एकाच छताखाली उपलब्ध होतील. सध्या तामिळनाडू, केरळमध्ये मत्स्य विद्यापीठ कार्यरत आहे. कोकणात असे विद्यापीठ झाल्यास महाराष्ट्रही या दोन राज्यांच्या पंक्तीत बसणार आहे.

72 टक्के मत्स्योत्पादन व 1700 कोटींची मत्स्यनिर्यात तसेच 70 खाड्यांमधील 1445 हेक्टर क्षेत्राचा विचार करता कोकणातच मत्स्य विद्यापीठ संयुक्तिक आहे. या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र निधीअभावी विद्यापीठ रखडता कामा नये. विद्यापीठामुळे मत्स्य तंत्रज्ञान व समद्रविज्ञान क्षेत्रात कोकणातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी नवी क्षेत्रं उपलब्ध होतील.” - अ‍ॅड. विलास पाटणे, अभ्यासक.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev Jankar assured the establishment of an independent Fishery University in Konkan