esakal | कणकवलीत बंदवरून राजकीय चढाओढ; शिवसेना-भाजपची परस्परविरोधी भुमिका: Maharashtra Bandh
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

कणकवलीत बंदवरून राजकीय चढाओढ; शिवसेना-भाजपची परस्परविरोधी भुमिका

sakal_logo
By
- राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) : महाराष्‍ट्र बंदला आज कणकवली (Kankavli Maharashtra Bandh) शहरात अपेक्षित प्रतिसाद मिळाल नाही. त्‍यामुळे काही शिवसैनिकांनी (Shivsena) दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्‍न केला. ही बाब भाजप पदाधिकाऱ्यांना समजताच त्‍यांनी दुकाने खुली असणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिले. पुष्पगुच्छ देऊनही त्‍यांचे अभिनंदन केले. बंद केलेली दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. या बंद दरम्‍यान कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी कणकवली शहरात बंदचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने शहरात सकाळी नऊ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यालय ते पटवर्धन चौक आणि तेथून परत शिवसेना कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जात होते. त्‍यामुळे अनेक दुकान व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यास सुरवात केली होती.

दरम्‍यान महाविकास आघाडीच्या पदयात्रेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना महिला आघाडीच्या नीलम सावंत, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस महींद्र सावंत, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, हर्षद गावडे, राजू शेट्ये, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, भूषण परुळेकर, भास्कर राणे, निसार शेख, शेखर राणे, अनिल हळदीवे, विलास गुडेकर, बाबू सावंत, विनायक मेस्त्री व महा विकास आघाडीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा: शाहू सहकारी कारखाना 'एकरकमी एफआरपी' देणार - समरजितसिंग घाटगे

महाविकास आघाडीच्या आवाहनानंतर महामार्गावरील काही व्यावसायिकांनी आपली दुकानेही बंद केली; मात्र पदयात्रा गेल्‍यानंतर ही दुकाने पुन्हा खुली करण्यात आली. त्‍यामुळे काही शिवसैनिक आक्रमक झाले होते. यात काही शिवसैनिकांनी पटवर्धन चौकातील एक बेकरी बंद पाडण्याचा प्रयत्‍न केला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली.

शिवसेनेकडून दुकाने बंद करण्याचा प्रकार होत असल्‍याचे लक्षात येताच नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, युवामोर्चाचे संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक अण्णा कोदे, भूषण परुळेकर आदींसह भाजप पदाधिकारी पटवर्धन चौकात दाखल झाले. त्‍यांनी बंद झालेली दुकाने उघडण्यास भाग पाडले. ज्‍या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. त्‍यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यापुढे कुणी दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्‍न केला तर त्‍याला आमचे संरक्षण असेल, अशीही ग्‍वाही नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.

loading image
go to top