
चमकणाऱ्या लाटा म्हणजे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणी आहे.
रत्नागिरी : कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर यावर्षी देखील चमकणाऱ्या लाटा पाहायला मिळतात. साधारणतः डिसेंबरनंतर फेब्रुवारीपर्यंत कोकणच्या सगळ्याच किनाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात निळ्या चमकणाऱ्या लाटा अनुभवायला मिळतात. गेल्या तीन चार वर्षात रत्नागिरी शहराच्या किनाऱ्यांसह सिंधुदूर्ग किनाऱ्यांवर देखील या लाटा अनुभवता येतात.
रत्नागिरीच्या आरे-वारेच्या समुद्रात किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा चमकताना दिसल्या. पहिल्या नजरेत त्यावर विश्वास बसला नाही. पण मग किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा वेगवेगळ्या ठिकाणी निळ्या रंगाने प्रकाशमान होताना दिसू लागल्या. मग मात्र राहवलं नाही... उत्सुकतेपोटी किनाऱ्यावर गेलो आणि जे दृश्य पहायला मिळाले त्यावर विश्वास बसत नव्हता. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा निळ्या रंगाने उजळून निघत होत्या. हे सगळं मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरत होता.
मध्यरात्र उलटून गेली होती किनाऱ्यावर कोणीच नव्हत. कोणाला हा प्रकार सांगावा तर विश्वास ठेवतील का ही शंका मनात येत होती. दीड दोन तास तिथे काढल्यानंतर किनाऱ्यावरून निघालो रत्नगिरीत पोहोचलो. पण त्या रात्री आरे-वारेच्या किनाऱ्यावर आजवर कधीही न अनुभवलेली जी दृश्य पाहिली होती ती डोळ्यासमोरून आणि डोक्यातून जात नव्हती. ही प्रतिक्रिया होती पहिल्यांदा दृश्य पाहणाऱ्या सचिन देसाई यांची.
याबाबत सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या, "रत्नागिरीच्या किनाऱ्याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटील्युका (noctiluca). समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात. जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात . या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश (bioluminescence ) निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनाऱ्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते.
निसर्गाच्या सानिध्यात आणि समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या कोकणातील मच्छिमारांकडे याबाबत चौकशी केली. त्यावर्षी प्रथमच या जीवांचे प्रमाण इतके अधिक असल्याचे मच्छिमारानी सांगितले. स्थानिक भाषेत रत्नागिरीचे मच्छिमार याला "पाणी पेटले" किंवा "जाळ" असे म्हणतात. यापूर्वी त्याचे प्रमाण लक्षातही न येण्या इतके अत्यल्प असायचे, असे जुन्या जाणत्या मच्छिमारांनी सांगितले. मात्र आता त्यांचे प्रमाण वाढल्याने ते नजरेत येऊ लागले आहेत. गेल्या चार वर्षाचा अनुभव असा आहे की थंडीचा मोसम सुरू झाला की कोट्यवधींच्या संख्येने ते रत्नागिरीच्या किनाऱ्यावर येत आहेत आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील लाटा फ्लोरोसंट निळा लाईट पेटवावा तशा प्रकाशमान होत आहेत. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्या संख्येत देशाच्या पश्चिम किनार्यावर आले आहे असे या विषयाचे अभ्यासक सांगतात. गेल्या तीन दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही किनाऱ्यावरील लाटा प्रकाशमान होऊ लागल्या आहेत.
स्थानिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या या चमकणाऱ्या लाटा म्हणजे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणी आहे. या दोन महिन्यात तुम्ही कोकणात आलात आणि तुमचं नशीब जोरावर असेल तर किनाऱ्यावर चमकणाऱ्या या अद्भुत दृश्यांचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता.
-सचिन देसाई ,रत्नागिरी.
संपादन- अर्चना बनगे