सिंधुदुर्गाची वाटचाल बिहारकडे - गावडे

अजय सावंत
Monday, 30 November 2020

गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याची घणाघाती टीका मनसेने सत्ताधाऱ्यांवर केली. जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणे जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा मनसेकडून निषेधही व्यक्त केला आहे. 

गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

बेकायदा वाळू व्यवसायावरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे.

अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्‍याच्या गर्तेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे. 

...तर मनसे रस्त्यावर 
राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच; मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Navnirman Sena criticizes the government in Sindhudurg district