चिपळूण पालिकेतील वाढीव कामांना महाआघाडीचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

पालिकेकडून झालेल्या वाढीव कामांना मंजुरी न देण्याचा ठराव आघाडीने केला होता. त्या कामांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. जिल्हाधिकारी यांनी अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याची सूचना मुख्याधिकारी यांना दिली होती. त्यानुसार सभा घेण्यात आली.

चिपळूण ( रत्नागिरी ) - पालिकेच्या वाढीव कामांना मंजुरी नाकारण्याचा ठराव महाविकास आघाडीने तडीस नेला. मात्र, अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याला पाठिंबा आहे की विरोध, हे स्पष्ट केले नाही. भाजपने अर्थसंकल्पाच्या पूनर्नियोजनाला पाठिंबा जाहीर करत महाविकास आघाडीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
चिपळूण पालिकेच्या अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात या घडामोडी घडल्या.

पालिकेकडून झालेल्या वाढीव कामांना मंजुरी न देण्याचा ठराव आघाडीने केला होता. त्या कामांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. जिल्हाधिकारी यांनी अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याची सूचना मुख्याधिकारी यांना दिली होती. त्यानुसार सभा घेण्यात आली. मुख्याधिकाऱ्यानी बजेटच्या पूनर्नियोजनचा हेतू स्पष्ट केला. काही नगरसेवकांनी वाढीव कामांच्या मंजुरीचा विषय लावून धरत सभागृहात जोरदार चर्चा केली. अपक्ष केळस्कर यांनी ठराव मांडायला सुरवात केली.

तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या वर्षा जागुष्टे आणि शिवानी पवार आक्रमक झाल्या. आमची तातडीची कामे झाली; मात्र 2016 पासून काही कामे प्रलंबित आहेत, ती व्हायला पाहिजेत. महाविकास आघाडीच्या ठरावामुळे पालिकेचे किंवा जनतेचे नुकसान झाले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगितले. अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन हा विषय पालिकेच्या इतिहासात प्रथमच आला. त्यावर प्रत्येकाने मत मांडा, अशी सूचना नगराध्यक्षांनी केल्यावर सर्वांच्यावतीने केळस्कर यांनी ठराव मांडला. त्यात मागील ठरावाची "री' ओढली.

आशिष खातू यांनी त्यावर आघाडीच्या ठरावामुळे पालिकेचे नुकसान होईल, हे स्पष्ट केले. मुख्याधिकाऱ्यानी अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याला पाठिंबा किंवा विरोध, हे ठरावामध्ये आले पाहिजे, अशी सूचना केली. भाजपने पाठिंबा असल्याचे जाहीर केले; मात्र केळस्कर यांनी पूनर्नियोजनावर भाष्य टाळले. भाजपचे चार आणि महाविकास आघाडीचे 19 नगरसेवक उपस्थित होते. महाविकास आघाडीने ठराव जिंकला. 

अर्थसंकल्पाचे पूनर्नियोजन करण्याच्या आदेशाच्या विरोधात महाविकास आघाडीने ठराव करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. 
- आशिष खातू, नगरसेवक चिपळूण  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Oppose To Increased Work In Chiplun Municipality