सिंधुदुर्गात डोळ्यांदेखत भातशेती पाण्याखाली 

रुपेश हिराप
Saturday, 17 October 2020

कापून ठेवलेली भात पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 
जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यंदा 4 हजार 800 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - यंदा अनुकूल हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती चांगले भाताचे उत्पन्न येण्याची शक्‍यता होती. त्यामुळे बळीराजा आनंदित होता; मात्र सतत 4 दिवस कोसळलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. कापून ठेवलेली भात पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 
जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यंदा 4 हजार 800 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा जिल्ह्यात तब्बल 63 हजार इतर क्षेत्रावर खरिपाच्या पिकांची लागवड झाली होती. त्यात सुमारे 55 हेक्‍टर क्षेत्र हे भात लागवडीखाली आले. राज्यात तळकोकणात सह्याद्रीच्या कुशीत आणि डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आणली जाते. ग्रामीण भागातील जवळपास 75 टक्के व्यक्ती शेतीकडे वळलेल्या दिसतात. त्यामुळे आंबा, काजूनंतर सर्वांत जास्त व्यक्तींचे उदरनिर्वाहाचे आर्थिक साधन हे शेतीच आहे. 

जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतीला वन्यप्राण्यांपासून धोका असतानाच दुसरीकडे ज्या पावसाच्या आधारावर राबराब राबून मोठ्या मेहनतीने ही शेती पिकविली जाते ती शेती परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून नुकसानीला बळी पडते. दरवर्षी परतीच्या पावसाचा तडाखा बसतो; मात्र मॉन्सूनचे आगमन योग्य वेळेत न झाल्यास परतीचा पाऊसही लांबणीवर पडतो. हळव्या व निमगरवे कालावधीतील पूर्णतः परिपक्‍व झालेली भातशेती शेतकरी कापणीच्या हंगामात सुरुवात करतो; मात्र परतीच्या पावसाच्या तडाख्यात मोठे नुकसान होते. दरवर्षी ही समस्या आहे. 

मोबदला मिळावा 
कृषी विभागाकडून पंचनामेही होतात; मात्र अपेक्षेप्रमाणे भरपाई मिळत नाही. जिल्ह्यात यंदा तीन हजार 195 शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. सर्वच शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा हमीपत्र लिहून घेण्यात येते; मात्र तरीही भरपाई मिळत नाही. या सर्वांचा विचार करून शासनाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून त्याचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

आणखी पाऊस? 
गतवर्षी 4431 मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा 4800 मिलिमीटर एवढा पाऊस आला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पूर्णत: दाणादाण उडवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांत आणखी पाऊस होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. 

शासन पंचनामे करते; मात्र भरपाईचे काय? आपल्या भागात गतवर्षीची भरपाई दिलेली नाही. भरपाई मिळत नसेल तर केवळ दिखाव्यासाठी पंचनामे करू नयेत. 
- समीर नाईक, शेतकरी, पाडलोस-केनिवाडा. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to agriculture in Sindhudurg district