‘तिरोडा-नाणोस पुलाचे
काम दर्जेदार करा''

‘तिरोडा-नाणोस पुलाचे काम दर्जेदार करा''

‘तिरोडा-नाणोस पुलाचे
काम दर्जेदार करा’
सावंतवाडी ः तिरोडा-नाणोस जोडणाऱ्या पुलाचे काम योग्य पद्धतीने करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला ‘रिटेनिंग वॉल’ची आवश्यकता असल्याने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांच्याकडे केली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या ‘रिटेनिंग वॉल’चे १ कोटी ७८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंत्रालयात बांधकाम खात्याकडे पाठविले आहे. हे पूल माजी खासदार विनायक राऊत यांनी ‘नाबार्ड’कडून २ कोटी ५० लाख मंजूर केले होते. या पुलाच्या पुढील ‘रिटेनिंग वॉल्स’संदर्भात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन मंजूर करण्याचे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला तिरोडा उपसरपंच संदेश केरकर, बाबल ठाकूर, सुरेश शेटे, सागर नाणोसकर, श्रीपाद ठाकूर, भास्कर गोडकर, मनोज वाघमोरे उपस्थित होते. पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येत असल्यामुळे शासनाने लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी जनतेची असल्याकडे भोसले यांनी लक्ष वेधले.
------
खोटलेकर यांना
‘समाजभूषण’
कुडाळ ः किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र व अखिल भारतीय मराठी भारतीय परिषद, सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य, कला पर्यटन-सामाजिक संमेलन व सन्मान सोहळा मालवण येथे झाला. या सोहळ्यात संस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग समाजभूषण पुरस्कार कुडाळ तालुक्यातील खोटले गावचे सुपुत्र व पंचशील ट्रस्ट ओरोसचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुस्तक प्रकाशन, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संमेलनाध्यक्ष नीलिमा गुप्ता, उद्योजक डॉ. दीपक परब (मुंबई), उद्योजक हेमंत कोळंबकर (देवबाग), पद्मश्री परशुराम गंगावणे (कुडाळ), अभिनेते संजय मोहिते, अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर, स्वागताध्यक्ष व समिती अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात, गजल संगीतकार अजय नाईक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ. ना. रसनकुटे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोमवंशी आदी उपस्थित होते.
--
वायरमन मृत्यूप्रकरणी
कुडाळात चौघांवर गुन्हा
कुडाळ ः कुडाळ-गवळदेव येथील विद्युत खांबावर काम करत असताना विद्युतभारित तारेचा धक्का लागून धनंजय बाबू फाले (वय २८, महादेवाचे केरवडे) यांच्या मृत्यूप्रकरणी महावितरणचे कुडाळ शाखेच्या सहायक अभियंता छाया परब यांच्यासह ठेकेदार कंपनी व ‘महावितरण’चे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चौघांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २१ जुलै २०२३ ला सकाळी १० वाजता घडली. ‘महावितरण’चे बाह्यस्रोत कर्मचारी धनंजय फाले हे गवळदेव येथील ११ के. व्ही. वाहिनीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाले होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) त्यांचा मृत्यू झाला. घटनेची फिर्याद उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी कुडाळ पोलिसांत दिली होती.
--
सुतार समाजातर्फे
२३ ला गुणगौरव
कुडाळ ः श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने २३ जूनला सकाळी १० वाजता श्री विश्वकर्मा भवन, झाराप येथे २०२४ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी. पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या सुतार ज्ञातीबांधवांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुतार ज्ञातीतील मुलांनी आपल्या तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संपर्क साधावा. कार्यक्रमास आपल्या गुणपत्रकांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष शरद मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com