रानावनात नव्हे, अगदी भरवस्तीतच बिनधास्त संचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

अगदी भरवस्तीत दिवसाढवळ्या दिसून आलेल्या या गव्यांमुळे लोकांमध्ये चिंता आहे. गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी-शिरोडा राज्यमार्गावरील माजगाव पंचमनगर परिसरात गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. या भागात यापूर्वीही गव्यांचे दर्शन घडले होते; मात्र दिवसाढवळ्या गवे दिसल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट आहे. सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. यातच गव्यांचा कळप भरवस्तीत फिरताना दिसत असल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. 

तालुक्‍यातील मळगाव नेमळे परिसरात गव्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाकडून जंगल हद्दीवर सौर कुंपण उभारण्यात आले आहे; मात्र असे असूनही अधूनमधून गव्यांचे दर्शन घडतच असते. आता मात्र गवे दिवसाढवळ्या मुक्तपणे अगदी भरवस्तीत फिरताना दिसू लागले आहेत. अशाच प्रकारे काल (ता.3) माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळाच्या समोरील परिसरात दोन गवे मुक्तपणे संचार करीत असल्याचे काहीजणांना दिसून आले. अगदी भरवस्तीत दिवसाढवळ्या दिसून आलेल्या या गव्यांमुळे लोकांमध्ये चिंता आहे. गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे. 

यापूर्वीही या भागात अनेक वाटसरूंना तसेच वाहनचालकांना गवे दिसले होते. या परिसरातील काही अंतरावर असलेल्या मुळगाव घाटीत गवे मुक्तपणे फिरताना आढळले होते. मळगाव घाटीतच एका गाडीला गव्याने धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटनाही घडली होती. त्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: male gaur issue sawantwadi konkan sindhudurg