मालवणातील समस्यांवर भाजपचे बोट, फडणवीसांना मागण्यांचे निवेदन

प्रशांत हिंदळेकर
Wednesday, 12 August 2020

कोरोना सारख्या महामारीतही आज केवळ एक डॉक्‍टर संपूर्ण रुग्णालयाचा कारभार सांभाळत असून परिणामी रुग्णांना अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा मिळत नाही.

मालवण (सिंधुदुर्ग) - अनधिकृत मासेमारी, आरोग्य, राज्य महामार्गांची दुरावस्था व इतर समस्यांकडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. 

फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमारांचा प्रश्न काही वर्षांपासून कायम आहे. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी, पर्ससीन नेट नौकांची अनधिकृत मासेमारी वाढली आहे; मात्र त्यांना रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहे.

वाचा - सिंधुदुर्गात गणेशोत्सव  साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : के मंजुलक्ष्मी 

सत्ताधारी शिवसेनेचे नेते पर्सनेट मासेमारी बाबत सिंधुदुर्गात एक तर रत्नागिरी जिल्ह्यात दुसरे विधान करतात. त्यामुळे अवैध मासेमारीला शासकीय पाठबळ आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. एलईडी मासेमारीला कायद्याने पूर्ण बंदी असतानाही सिंधुदुर्गात एलईडी मासेमारी होते. परिणामी, आज पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यात गेली काही वर्षे मत्स्यदुष्काळ देखील जाणवू लागला असून पारंपरिक मच्छीमारांच्या मागणी नुसार जिल्ह्यात स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा. मच्छिमारी हेच सिंधुदुर्गातील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे हा व्यवसाय जीवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला उभारी द्यावी, मार्च पासून हॉटेल्स बंद असून वीज बील आणि बॅंकेच्या हप्त्यात सवलत मिळावी, अशी मागणी केली. 

हेही वाचा - यासाठी रत्नागिरी जिल्हा आहे राज्यात अग्रेसर

ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्‍न 
ग्रामीण रुग्णालय मृत्यूशय्येवर आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. कोरोना सारख्या महामारीतही आज केवळ एक डॉक्‍टर संपूर्ण रुग्णालयाचा कारभार सांभाळत असून परिणामी रुग्णांना अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा मिळत नाही. येथे कोणताही रुग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालय किंवा ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे याठिकाणी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जावीत, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली. 

मार्गाची दुरवस्था 
मालवण-कसाल आणि मालवण-कुडाळ या दोन्ही राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. येथून प्रवास करणे म्हणजे जिकरीचे असून या मार्गांवर अनेक छोट्या-मोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत. दरवर्षी या महामार्गांची किरकोळ दुरुस्ती केली जाते. तरीही हा रस्ता दर्जेदार होत नाही. तरी या दोन्ही राज्य महामार्गाच्या कामांना चालना मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी सावंत यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvan BJP's statement to Fadnavis