अमली पदार्थप्रकरणातील मालवणचा म्होरक्‍या गायब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

मालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

या गंभीर प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्वतः लक्ष घातले असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. गेले काही महिने पर्यटनाचे केंद्रबिंदू बनलेल्या मालवणसह देवबाग, तारकर्ली येथे अमली पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात बड्या धेंडांचा हात असल्याने पोलिस कारवाई केली जात नसल्याच्या चर्चाही अलीकडच्या काळात जोर धरू लागल्या होत्या. 

याचदरम्यान गेल्या शनिवारच्या सुमारास एका शाळकरी मुलाच्या पालकांनी पोलिस ठाणे गाठत आपल्या मुलाच्या खिशात महागडे परदेशी लायटर आणि अन्य साहित्य सापडले असल्याची माहिती दिली होती. 

दस्तुरखुद्द पालकांनीच पोलिसांना माहिती देऊनही पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे पोलिसी कारवाईबाबत शहरात संशय व्यक्त केला जात होता. अमली पदार्थाच्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी जातीने लक्ष घातले आणि अमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढू, असे स्पष्ट केले. 

गेले काही दिवस वृत्तपत्रांतून अमली पदार्थांच्या रॅकेटविषयी बोलबाला झाल्यानंतर या रॅकेटमध्ये गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. या रॅकेटचा म्होरक्‍या असणारा बॉईज गॅंगचा लीडर पसार झाल्याची चर्चा सुरू आहे. शहरात गेल्या काही दिवसांत धूम स्टाईलने वाहने चालविणाऱ्यांचे जे अपघात होत आहेत, त्यामागे अमली पदार्थांचे कारण तर नसावे ना असा सवालही सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvan Drug case follow up