विनामास्क पर्यटकांना मालवणात दंड 

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 22 November 2020

दिवाळी कालावधीत 10 हजाराचा दंड वसूल करणाऱ्या पालिकेने 19 व 20 नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल 11 हजाराचा दंड वसूल केला आहे. मागील 12 दिवसांतील एकूण दंड 21 हजारावर पोचला आहे

मालवण (सिंधुदुर्ग) - येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. अनेक पर्यटक विनामास्क फिरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील पालिकेने कारवाई मोहीम तीव्र करत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दिवाळी कालावधीत 10 हजाराचा दंड वसूल करणाऱ्या पालिकेने 19 व 20 नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल 11 हजाराचा दंड वसूल केला आहे. मागील 12 दिवसांतील एकूण दंड 21 हजारावर पोचला आहे. 

काल (ता.20) येथील दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. पर्यटक अतिथी देवी भव आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नका. बंदर जेटीवर तर कारवाई करूच नका, अशा सूचना आमदार नाईक यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना केल्या आहेत. कारवाई न करता मास्क लावा याबाबत रिक्षाने लाऊडस्पीकरद्वारे माहिती द्या; मात्र कारवाई करू नका, अशी सूचनाही आमदार नाईक यांनी केली. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री जनतेला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, असे आवाहन करत असताना आमदार नाईक यांच्या कारवाई विरोधी भूमिकेमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

...तर जबाबदार कोण? 
विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई निश्‍चित झाली असताना आमदार नाईक यांनी कारवाई नको, अशी भूमिका घेतली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नियम पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे, असे असताना येथे दाखल होणारे पर्यटक विनामास्क फिरत असतील तर पुढील कालावधीत कोरोना संसर्ग वाढल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvan Municipality fines tourists without masks