मालवणचे पर्यटन कात टाकतेय..!

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 22 जानेवारी 2018

मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मालवणचे पर्यटन लवकरच जागतिक स्तरावर पोचेल.

मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मालवणचे पर्यटन लवकरच जागतिक स्तरावर पोचेल.

नवनवीन संकल्पना
पर्यटन जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्‍यात पर्यटनासाठी अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही वर्षांत नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आल्या. यात सुरवातीच्या स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, साहसी जलक्रीडापाठोपाठ आता वॉटरपार्क, समुद्रात न उतरता समुद्र तळातील निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या ग्लास बॉटम सुविधा आदी संकल्पना पाहावयास मिळत आहेत.

कोकणच्या पर्यटनाचा प्रारंभीचा काळ
नव्वदच्या दशकात उर्वरित भारतात विविध कारणांमुळे अशांतता असताना महाराष्ट्रात विशेषतः कोकणात एमटीडीसीने पर्यटन रुजविण्याचा आरंभ केला. गणपतीपुळेपाठोपाठ तारकर्लीच्या सुरूबनात सुरू झालेल्या एमटीडीसीच्या तंबू निवासाने सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा श्रीगणेशा केला.

निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ समुद्रकिनारे, मुबलक प्रमाणात आणि स्वस्तात मिळणारे मासे आणि संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रापासून पाच-सहा तासांत गाठता येणारा पल्ला, हे पाहता कोल्हापूर ते पुणे पट्ट्यातील नागरिकांच्या सहकुटुंब सहली, शिवछत्रपतींचा किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची पावले मालवण- तारकर्लीकडे वळू लागली आणि आलेल्या पर्यटकांकडून बाहेर येथील निसर्ग आणि मिळणाऱ्या सुविधांबाबत सकारात्मक प्रतिक्रियांमुळे पर्यटन वाढू लागले.

निवास व्यवस्थेचा विस्तार
तारकर्लीच्या तंबू निवासात सुटीच्या दिवसात शेकडोंच्या संख्येने उतरणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना एमटीडीसीची व्यवस्था अपुरी पडू लागली. साहजिकच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आपल्या राहत्या घरात शे-पाचशे रुपयांत त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी एमटीडीसीची निवास व न्याहारी योजना आली. त्याचा सगळ्यांत मोठा लाभ कोकण पट्ट्यातील वंशपरंपरागत तैलबुद्धी लाभलेल्या सर्वसामान्यांनी घेतला आणि आपल्या कौलारू घरातच आणि नारळी पोफळीच्या बागांत चार-चार पाच-पाच पर्यटक कुटुंबांची निवासाची सोय करायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता अवघ्या सात-आठ वर्षांत सुरुवातीला एमटीडीसीच्या तारकर्ली तंबू निवासाच्या परिसरात आणि मग तारकर्लीपासून मालवणपर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टी भागात घराघरांतून निवास, न्याहारीचे फलक झळकू लागले. 

...आणि निवास व्यवस्थेने कात टाकली
नव्वदच्या दशकाच्या अंतिम पर्वात आणि एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातच तारकर्लीकडे वाढलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन एमटीडीसीने आपल्या स्वस्तातल्या तंबू निवासाचे रूपांतर परंपरेचा साज ल्यालेल्या आणि आधुनिक सोईंनीयुक्त अशा कोकणी हट्‌सच्या आलिशान अशा पर्यटन केंद्रात केले. साहजिकच चार-पाचशे रुपयांत होणाऱ्या निवासाच्या सोईला आता दीड हजार रुपये मोजावे लागू लागले. एका रात्रीच्या निवासासाठी दीड हजार रुपये परवडणारे उच्च मध्यमवर्गीय पर्यटकांचे एमटीडीसीचे तारकर्ली पर्यटन केंद्र हॉट डेस्टिनेशन म्हणून नावारूपास आले. मालवण, तारकर्लीपाठोपाठ देवबागमध्येही एकाहून एक सुरेख अशा वास्तू रचनेने नटलेल्या आणि आधुनिक, अत्याधुनिक आणि तारांकित अशा सोयी-सुविधांनी युक्त रिसॉर्टस्‌ची निर्मिती वेगाने झाली. झपाट्याने झालेल्या या प्रगतिशील बदलामुळे मालवण, तारकर्ली, देवबागकडे श्रीमंत आणि उच्चभ्रू पर्यटकांचा वावर वाढू लागला आणि नव्या शतकाच्या पहिल्या अवघ्या पाच-सात वर्षांतच या भागातील पर्यटन व्यवसायाचा प्रवास हाफपॅंट, बनियन पर्यटकांकडून रोल्स रॉईस पर्यटकांपर्यंत हा हा म्हणता झाला.

साहसी सागरी जलक्रीडा
स्नॉर्कलिंगच्या पुढे जाऊन मच्छीमारी होड्यांतून पर्यटकांसाठी डॉल्फीनचे दर्शन घडविणाऱ्या डॉल्फिन सफारीची सुरुवात केली. याला मिळणाऱ्या पर्यटकांच्या प्रतिसादाचा अंदाज घेत घेतच यातल्याच काहींनी देवबागच्या खाडीत आणि समुद्रात साहसी जलक्रीडा सुविधेचा पाया रचला. कयाक, बनाना राईड, बंपर राईड, जेटस्की आदींसाठी लक्षावधी रुपयांची आणि पॅरासेलिंगसारख्या थरारक पण अस्मान भरारी मारत असतानाच झटकन सागरात डुबकी घेण्याचा आनंद देणाऱ्या साहसी क्रीडा प्रकारासाठी मिळून जवळपास कोट्यवधी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी आरंभीच्या काळात या युवकांना प्रसंगी आपल्या राहत्या घरांसह पिढीजात जमीनजुमला बॅंकांकडे गहाण टाकावा लागला होता; पण त्यांचे हे धाडसच सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हे बिरुद देते झाले. सातत्याने वाढत्या पर्यटकांच्या संख्येने पर्यटन फुलत राहिले.

पुढचे पाऊल
या क्षेत्रातच यंदापासून आणखी दोन पावले पुढे टाकण्यासाठी येथील मच्छीमार युवक पुन्हा एकदा सज्ज झाले. सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील काहीशा उथळ आणि सुरक्षित समुद्रात मरिन वॉटरपार्क उभारून ज्येष्ठांपासून कोवळ्या मनाच्या कच्चाबच्च्यांपर्यंत सर्वांनाच समुद्राच्या पाण्याशी सुरक्षितपणे दंगामस्ती करण्याचा आनंद खुला केला. समुद्राच्या पाण्याशी मनमुरादपणे खेळण्याच्या या नव्या व्यवस्थेचे पर्यटकांनी अभूतपूर्व स्वागत केले. त्याच्या पाठोपाठ चिवल्याच्या वेळेवरील शांत समुद्रात काचेच्या तळ असलेल्या नौकांचे जलावतरण करून पाण्यात उतरण्यास बिचकणाऱ्या पर्यटकांची समुद्राखालील विश्‍वाचा धांडोळा घेण्याची व्यवस्थाही केली. या ग्लास बॉटम नौकेच्या सुविधेमुळे खास करून स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आदी साहसे विविध कारणांनी झेपू न शकणाऱ्या पण समुद्राखालील विश्‍व पाहण्याची आस मनी बाळगणाऱ्याची सोय झाली.

कोट्यवधींची उलाढाल
जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, मालवणातील दांडी, बंदर जेटी, राजकोट, चिवला वेळा या भागांसह सर्जेकोट, तळाशिल-तोंडवळी या भागांतही गेल्या तीन-चार वर्षांत स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगचा व्यवसाय वाढताच राहिला आहे. नोकरीच्या मागे न लागता स्थानिक मच्छीमारांची पुढची पिढी या व्यवसायात मोठे धाडस करून उतरली आहे. यातून किनारपट्टी भागात पर्यटन हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून या व्यवसायामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या राहणीमानात मोठा बदल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गरज क्षितिजापलीकडे पाहण्याची
देवगड आणि वेंगुर्ल्याच्या किनारपट्टी भागात साहसी जलक्रीडा प्रकार पर्यटकांना निमंत्रण देत उभे ठाकू लागले आहेत. सिंधुदुर्गाच्या ११० किलोमीटर लांबीच्या या किनारपट्टीवर आता हळूहळू खऱ्या अर्थाने पर्यटन संस्कृती व्यवसाय म्हणून रुजू पाहत आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून अधिक खोल पाण्यातील पाणबुडी (सबमरीन) पर्यटन सुविधेसारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या पण तेवढ्याच चित्तथरारक सुविधांच्या निर्मितीची वेळ आता येऊन ठेपली आहे. याचबरोबर संथपणे वाहणाऱ्या या परिसरातील सर्वच खाड्यांतून केरळच्या धर्तीवर हाऊस बोटींचा व्यवसाय करण्यास इथल्या युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी आकाशदर्शनाची व्यवस्था करायला हवी. रात्रीच्या वेळी जंगल भटकंती, पहाटेच्या वेळी पक्षी दर्शन, पावसाळ्यात एमटीडीसीसारख्या संस्थांनी पर्यटकांना इकडे वळविले पाहिजे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून ३६५ दिवस पर्यटकांचा ओघ सुरू राहून सिंधुदुर्ग जिल्हा वर्षभर वाहता राहणे गरजेचे आहे.

हंयसरंच पिकवयां सोनां! 
कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच इंडोनेशियात झालेल्या भूकंपाने निर्माण झालेल्या त्सुनामीने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार समाजाला भयचकीत करून टाकले; पण त्यातूनच केवळ अपघाताने मध्य महाराष्ट्रातील अकलूजचा एक युवा सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णींच्या रूपाने मालवणकडे आकर्षित झाला. शिक्षण आणि संशोधनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर या पाण्याखालील प्रवाळ बेटावर वावरलेला आणि त्सुनामीच्या प्रलयावेळी अंदमान, निकोबार बेटावर हजारो लोकांचे प्राण वाचविण्यात सहाय्यभूत ठरलेला हा युवा शास्त्रज्ञ मालवणच्या समुद्रातील किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समुद्राच्या पोटात दडलेल्या निसर्गाच्या अद्‌भुत निर्मितीच्या अक्षरशः प्रेमात पडला आणि पुन्हा एकदा ‘एमटीडीसी’ने डॉ. कुलकर्णींच्या मदतीने स्नॉर्कलिंगच्या रूपाने सागरी पर्यटनाला एक वेगळाच आयाम निर्माण करून दिला. स्नॉर्कलिंगच्या माध्यमातून उथळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत तरंगत सागर तळाचा वेध घेत घेत समुद्राच्या पोटातील अद्‌भुत विश्‍वाचा हा नजारा लुटण्यासाठी मग हा हा म्हणता लाखो पर्यटकांची रीघ लागली. पर्यटन हा आपल्या सागराशी निगडित जीवनशैलीवर अतिक्रमण करणारा, त्यापासून वंचित करणारा असा व्यवसाय नसून उलट या जीवनशैलीशी पूरक आणि प्रसंगी अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय होऊ शकतो, हे मच्छीमारांना समजले. आपल्या कल्पकतेने स्नॉर्कलिंगच्या पाठोपाठ अधिक खोल पाण्यात सूर मारणाऱ्या स्कूबा डायव्हिंग या अधिक साहसी सागरी खेळाची मुहूर्तमेढ इथल्या युवकांनी मोठ्या िहमतीने रोवली. ‘एमटीडीसी’नेही मग आणखी एक सकारात्मक पाऊल उचलत तारकर्लीला पॅडीच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र उभे करून इथल्या मच्छीमार युवकांना अत्यल्प खर्चात डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यातूनच आजवर केवळ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया खंडात आणि भारताच्या अंदमान, निकोबार परिसरांत मिळू शकणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे डायव्हिंगचे प्रशिक्षण तारकर्लीत मिळू लागल्याने मोठ्या संख्येने मच्छीमार युवक यात उतरून डाईव्ह मास्टर होऊ लागले. यातल्याच काहींना देश, विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही उपलब्ध झाल्या; पण बहुतेक जणांनी ‘हंयसरंच पिकवयां सोनां’ या भावनेने स्वतःचा स्कूबा डायव्हिंगचा व्यवसाय करण्यास आरंभ केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः मालवण परिसरातील पर्यटन व्यवसायाचा सर्वांत प्रथम अंगीकार करणारा एक व्यावसायिक म्हणून मी मागील पंचवीस वर्षांत घडत गेलेल्या प्रत्येक बदलाचा साक्षीदार आहे. आरंभीच्या काळात पर्यटनामुळे सांस्कृतिक प्रदूषणाची भीती बाळगणारा इथला मच्छीमार समाज आज मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायात उतरून आपल्या आदरातिथ्याने येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकत आहे. ऐतिहासिक रापण संस्कृतीने या भागात रुजविलेल्या परस्पर सहकार्याच्या सहकाराच्या रीतिरिवाजामुळे पर्यटनाच्या विविध छोट्या-मोठ्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या गुंतवणुकीसाठी युवकांचे गट एकत्रित होऊन स्वभांडवलावर व्यवसाय उभारण्याचा एक नवा आदर्श यातून निर्माण झाला आहे. मागील पंचवीस वर्षांत प्रत्येक टप्प्यावर पर्यटकांना आकर्षून घेणारी नवनवीन साधने निर्माण होत राहिल्याने नवीन पर्यटकांसोबत वारंवार येणाऱ्या पर्यटकांनी आता दशलक्षाचा आकडा गाठला आहे. लवकरच सुरू होणारा चिपी विमानतळ, आंग्रीया बॅंक, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतुकीद्वारे कोकणातील बंदरे मुंबईशी जोडणारी महत्त्वाकांक्षी योजना, कोकण रेल्वेचे विद्युतीकरण या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या सकारात्मक प्रगतिशील बदलांचा विचार करता हा ओघ आणखी वाढणार यात शंका नाही. यापुढे पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी सूर्य मावळल्यानंतरच्या आकाशदर्शन, जंगलभ्रमंती, चित्रपटगृहे, हाऊसबोट यांसारख्या सुविधांची निर्मिती होणे गरजेचे आहे. याचबरोबर किमान एक पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवणे हे अत्यावश्‍यक आहे.
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात जे बदल होत गेले त्याचे सर्व श्रेय हे स्थानिकांनाच जाते. एकीकडे जिल्ह्यात पर्यटन वाढत असताना दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने मार्केटिंग होत आहे. याचा परिणाम भविष्यात येथील पर्यटन व्यवसायाला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, साहसी जलक्रीडा प्रकार हे सर्व व्यवसाय एका छताखाली येणे आवश्‍यक आहे. शिवाय यावर शासनाचे नियंत्रण राहायला हवे. पर्यटन व्यावसायिकांनी आवश्‍यक परवानग्या मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केले; मात्र हे प्रस्ताव वर्षानुवर्षे मुंबईत तसेच पडून आहेत. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्यास व्यावसायिकांना सातत्याने मुंबईला फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविताना या परवानग्या जिल्हा स्तरावरच उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करायला हवी. किनारपट्टी भागातील पर्यटन व्यवसायांवर स्थानिक प्रशासनाचे अधिकारी वर्षभरात केवळ लेव्ही भरून घेण्यासाठी फिरतात. अन्य वेळी नियमांप्रमाणे सागरी पर्यटन होत आहे का? याची पाहणी या अधिकाऱ्यांकडून होत नाही. त्यामुळे आठ दिवसांतून एकदा तरी अधिकाऱ्यांनी किनारपट्टी भागात भेट द्यायला हवी. राज्याच्या किनारपट्टी भागात एखादी दुर्घटना घडल्यावरच हे अधिकारी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात भेट देत नौकांची पाहणी करताना दिसतात. गोव्यात पर्यटन व्यावसायिकांना विविध साहित्य खरेदीसाठी अनुदान मिळते. असे अनुदान महाराष्ट्र शासनानेही द्यायला हवे. शासनाकडून पर्यटन व्यावसायिकांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. याचा विचार करता व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.
- मनोज खोबरेकर, पर्यटन व्यावसायिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malvan tourism issue