esakal | Malvan : पर्यटन खुले; पण हात बांधलेलेच
sakal

बोलून बातमी शोधा

water sports

Malwan : पर्यटन खुले; पण हात बांधलेलेच

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र याचबरोबर नौकाविहार, साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे पालकमंत्री, खासदार, आमदार आम्हाला न्याय मिळवून देतील का? असा प्रश्न येथील पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे.

कोरोना काळात सर्वाधिक फटका हा पर्यटन व्यवसायास बसला. जलक्रीडा, नौकाविहार, स्कूबा, स्नॉर्कलिंगसारखे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाल्याने पर्यटन व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याप्रश्‍नी सातत्याने व्यावसायिकांनी शासनाचे लक्ष वेधले मात्र अद्यापही शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जलक्रीडा प्रकार, स्कूबा, स्नॉर्कलिंग यासारख्या पर्यटनाचा आनंद लुटण्यास देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते. बाजारपेठेतही चांगली उलाढाल होऊन पर्यटनावर आधारित सर्व व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो.

कोरोनाच्या काळात जलक्रीडा, स्कूबा, स्नॉर्कलिंग, नौकाविहार सेवा पूर्णतः बंद राहिल्याने या पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. लाखो रुपयांची कर्जे काढून ती गुंतवणूक या व्यवसायात अनेक व्यावसायिकांनी केली. मात्र पर्यटनच ठप्प राहिल्याने कर्जाची परतफेड करताना या पर्यटन व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. आता शासनाने किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस परवानगी दिली आहे. किल्ला पाहण्यास येणारे पर्यटक हे स्कूबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकारांचाही आनंद लुटण्यास येतात. या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी नौकाविहारासह, जलक्रीडा प्रकार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: पालिका रणांगण - दलबदलू राजकारणाला वेग, शिवसेनेलाच पसंती

दीड वर्षांत जलक्रीडा, स्कूबा, स्नॉर्कलिंग व्यवसाय बंद राहिल्याने कर्जाचा डोंगर व्यावसायिकांचा डोक्यावर आहे. अनेकांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- दामोदर तोडणकर, जलक्रीडा व्यावसायिक

आर्थिक कोंडी

दोन वर्षांत जलपर्यटन व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. लाखोंची गुंतवणूक करूनही व्यवसाय ठप्प झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. शिवाय या व्यवसायातून रोजगार मिळविणारे अनेक तरूण आज बेरोजगार झाले आहेत. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून जलक्रीडा प्रकार, नौकाविहार सुरू करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी

कोरोना संकटात पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. लाखो रुपयांची गुंतवणूक आम्ही या व्यवसायात केली; मात्र निर्बंधामुळे पर्यटक आले नाहीत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे या गंभीर प्रश्नाची पालकमंत्री, खासदार, आमदारांनी दखल घेत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जलक्रीडा व्यावसायिक तोडणकर यांनी केली.

loading image
go to top