मालवणातील पर्यटन बोट दुर्घटनेमुळे सुनेसुने

पर्यटकांची पाठ; सुमारे १०० कोटींचे नुकसान
पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून, मालवण
पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून, मालवण sakal

मालवण : तारकर्लीत घडलेल्या बोट दुर्घटनेचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायास बसला आहे. जलक्रीडा व्यवसायाबरोबरच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्याने पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून, मालवण सुनेसुने बनले आहे. सद्यःस्थितीत समुद्र शांत असून, हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात निसर्गानेही चांगली साथ दिली आहे. मात्र, एका व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे येत्या दहा-बारा दिवसांचा पर्यटन हंगाम वाया गेल्याने किनारपट्टी भागातील पर्यटन व्यावसायिकांचे सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोना महामारीच्या संकटानंतर पर्यटन खुले झाल्यानंतर देश, विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणात विविध राज्यांतून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यामुळे मालवणसह तारकर्ली, देवबाग, वायरी भूतनाथ, तोंडवळी, तळाशील, सर्जेकोट, आचरा किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेल्याचे दिसून आले. किल्ला दर्शनाबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकाराचा आनंद पर्यटकांकडून लुटण्यात आला. यातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. हॉटेल्स, निवास न्याहरी, लॉजिंग, रिसॉर्टधारकांबरोबरच पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसायही तेजीत राहिला. त्यामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच तारकर्ली येथे बोट दुर्घटना घडली. यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत साहसी जलक्रीडा प्रकाराबरोबरच किल्ला दर्शनासाठीची प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सर्वसाधारणपणे १० ते १२ जूनपर्यत किल्ला दर्शनासाठी प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू ठेवण्याची मुदत बंदर विभागाकडून दिली जात होती. मात्र, तारकर्लीत घडलेल्या दुर्घटनेमुळे यावर्षी अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना बंदर जेटीवरूनच किल्ला दर्शन करत माघारी परतावे लागले.

सध्याची परिस्थिती पाहता अजून आकाश खुले असून समुद्रही शांत आहे. त्यामुळे पर्यटन जून महिन्याच्या १० ते १२ तारखेपर्यत सुरू ठेवणे शक्य झाले असते. यातून बऱ्यापैकी पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय झाला असता. मात्र, एका पर्यटन व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका किनारपट्टीवरील अन्य सर्व पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले. शेवटच्या टप्प्यातील शेवटचे काही दिवस व्यवसाय न करता आल्याने सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे येथील पर्यटन व्यावसायिकांनी स्पष्ट केले.

कोरोना संकटात कोकणातील पर्यटनाचा आनंद लुटता आला नाही. मात्र, पर्यटन खुले झाल्यानंतर मित्रांसह सिंधुदुर्गातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्याबरोबरच किल्ले दर्शन, स्कूबा, स्नॉर्कलिंग अन्य साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी येथे आलो. मात्र, येथे किल्ले दर्शन तसेच जलक्रीडा प्रकार बंद असल्याचे कळल्याने हिरमोड झाला. बंदर जेटीवरूनच किल्ल्याचे दर्शन घ्यावे लागले. दोन-तीन मुक्काम करून येथील पर्यटनाचा आनंद लुटण्याचा विचार होता. मात्र, पर्यटनस्थळच बंद असल्याने माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

- एक पर्यटक, पुणे इतरांनाही फटका

रिसॉर्टधारक, निवास न्याहरी, लॉजिंग व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. अन्य छोट्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटन सुरू राहिले असते तर त्याचा चांगला फायदा पर्यटन व्यावसायिकांना झाला असता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com