राजकारणात `इथे` कोण मुलाला तर कोण मुलीला करत आहे पुढे, पण कशामुळे?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज व मल्टिस्पेशालिटी कॉलेज या फक्त घोषणा आहेत. आजची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा मिळत नाहीत.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - गेले चार महिने मतदारसंघातील जनतेपासून दूर असलेले आमदार दीपक केसरकर दुसऱ्याच मार्गावर आहेत. जनतेच्या मनातही तशी शंका निर्माण झाली आहे. याचाच फायदा उठवत कोण मुलाला तर कोण मुलीला या ठिकाणी पुढे करत आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. 

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरुन सत्ताधारीच आमदार, खासदार जिद्दीला पेटले आहेत; मात्र मुळात हे हॉस्पिटल कागदोपत्री आजही कुडाळ येथेच मंजूर आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ते उभारण्याआधी असलेल्या रुग्णालयातील सोईसुविधा सुधाराव्या, असा टोलाही त्यांनी लगावला. 
श्री. उपरकर यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री, कुणाल किंनळेकर, आशिष सुभेदार, प्रसाद गावडे, संतोष भैरवकर आदी उपस्थित होते. श्री. उपरकर म्हणाले, ""जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज व मल्टिस्पेशालिटी कॉलेज या फक्त घोषणा आहेत. आजची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा मिळत नाहीत. कुडाळ येथील महिला रुग्णालयासाठी अद्यापही वीज व पाण्याची सोय उपलब्ध होत नसल्याने ते अद्यापही सुरू झाले नाही. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या हॉस्पिटलसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचे जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात निधीच नसल्याने हे हॉस्पिटल रखडले आहे. कुडाळ येथे मंजूर असलेले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सावंतवाडीत होत आहे; मात्र सावंतवाडीत जागेवरून सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार जिद्दीला पेटले आहेत. उद्या हॉस्पिटलसाठी जागा निश्‍चित होईल, ठेकेदार ठरेल, इमारत उभी राहील; मात्र यंत्रणेअभावी ती मोकळी दिसेल. त्यामुळे पोकळ घोषणा करुन जनतेला फसविण्याचे काम सर्वच करत असून त्यात सत्ताधारी लोक निरनिराळी विधाने करुन जनतेची करमणूक करत आहेत.'' 

ते म्हणाले, ""आजही आम्ही आमदार केसरकर यांच्या चष्मा कंपनी, आयटी कंपनी, रोपवे, सेटअप बॉक्‍स यांची वाट पाहत आहोत. गेले चार महिने केसरकर यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे; मात्र येथील निवडून दिलेल्या जनतेला योग्य सुविधा मिळतात का, याबाबत गेले चार महिने त्यांनी फिरकूनही पाहिले नाही. ते गप्प बसून दुसऱ्याच मार्गावर जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्याबद्दल जनतेच्या मनात शंकाही निर्माण होऊ लागली आहे. याचा फायदा उठवत या मतदारसंघात कोण आपल्या मुलाला तर कोण आपल्या मुलीला पुढे करत आहेत. त्यामुळे येथील सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली गणिताची फसवणूक थांबवून येथील जनतेला चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा.'' 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manase General Secretary Prashuram Uparkar Comment On MLA Deepak Kesarkar