मंडणगड तालुक्यात 79 गावांनी रोखले कोरोनाला 

सचिन माळी
Monday, 19 October 2020

सध्या तालुक्‍यात 10 बाधित रुग्ण असून त्यातील चारजण मंडणगड कोविड सेंटर, दापोली 2, चिपळूण 1 व 3 होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने मंडणगडवर मोठी जबाबदारी होती.

मंडणगड ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग वाढला. तरीसुद्धा मंडणगड तालुक्‍यातील 109 गावांपैकी 79 गावांतून कोरोनाचा शिरकाव रोखण्यास तालुका व स्थानिक यंत्रणेला यश आले. वेळीच घेतलेली दखल, सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे या गावांनी वेशीबाहेरच कोरोनाला रोखले. कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 25, पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्र 22 आणि देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात 32 गावे कोरोनामुक्त आहेत. 

सध्या तालुक्‍यात 10 बाधित रुग्ण असून त्यातील चारजण मंडणगड कोविड सेंटर, दापोली 2, चिपळूण 1 व 3 होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने मंडणगडवर मोठी जबाबदारी होती. मंडणगडात पहिला रुग्ण 3 मे रोजी आढळला. तहसीलदार वेंगुर्लेकर, पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भावठाणकर, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरसे, पोलिस निरीक्षक उत्तम पीठे, मंडणगडचे तत्कालीन मुख्याधिकारी संतोष माळी, गटविकास अधिकारी दिघे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यानी कोरोना विरोधाची लढाई लढली.

लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वच यंत्रणांनी अहोरात्र काम केले. गावोगावच्या ग्राम कृतिदल, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, सरपंच व ग्रामस्थांनी यात आपला कृतिशील सहभाग नोंदवत हातभार लावला. तालुक्‍याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केले. ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन केले. आरोग्य तपासणी मोहीम कडकपणे राबविली. आवश्‍यक असेल तरच बाहेर पडणे याकडे कटाक्षाने लक्ष दिले. 

एकूण क्वारंटाईन : 

  • मुंबई, पुणे, आलेले- 19636 
  • विदेशी नागरिक- 118 
  • कोरोनाबाधित - 127 (शहर- 86, ग्रामीण- 41) 
  • बरे झालेले रुग्ण- 113 
  • मृत्यू- 4 
  • तालुक्‍यात बाहेरून आलेले - 24429 

प्रत्येक घरातील सदस्यांचे आरोग्य सर्वेक्षण केले. कोरोनाची साखळीच खंडित करण्यावर भर दिल्याने तालुक्‍यात रुग्ण प्रमाण कमी आले. कोविड सेंटर मंडणगड, पणदेरी, देव्हारे, कुंबळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. फिव्हर क्‍लिनिक चालू केले. 
- डॉ. प्रभाकर भावठाणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mandangad Taluka 79 Villages Away Form Corona