आमसभेतून पळ काढण्यासाठीच वैभव नाईक यांची जनसंवाद यात्रा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

मालवण - गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले आहेत. आमसभा घेऊन जनतेसमोर येण्याची हिंमत नसल्यामुळे पळ काढण्यासाठीच त्यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढल्याची टीका स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

मालवण - गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले आहेत. आमसभा घेऊन जनतेसमोर येण्याची हिंमत नसल्यामुळे पळ काढण्यासाठीच त्यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढल्याची टीका स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आमदारांच्या संवाद यात्रेत शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश हे आमच्या पक्षात असलेल्या हेव्यादाव्यांमुळे आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये, असा टोला केणी यांनी लगावत पक्षात हेवेदावे असल्याची कबुली दिली आहे. 
आमदार नाईक यांच्या मालवण-कुडाळ मतदारसंघात सुरू असलेल्या जनसंवाद अभियानावर पत्रकार परिषद घेत, केणी यांनी जोरदार टीका केली.

स्वाभिमानचे सरचिटणीस महेश जावकर, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, संदीप भोजने, छोटू सावजी आदी उपस्थित होते. आमदार नाईक गावागावांत जाऊन ४०-५० कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना विकासनिधीची पत्रे देत सुटले आहेत. आचारसंहिता लागण्यास काही दिवस असल्याने आचारसंहितेच्या काळात ही कामे होणार का? केवळ निवडणुकीत कार्यकर्त्यांनी काम करावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या पत्रांचे वाटप आमदारांकडून सुरू असल्याची टीका केणी यांनी केली. 

तालुक्‍यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. काही महिन्यांपूर्वी केलेले रस्तेही उखडून गेले आहेत. बंधारा, सोनवडे पूल उभारण्यास परवानग्या नाहीत. मच्छीमारांचे प्रश्‍नही जैसे थे आहेत. युवकांना रोजगार नाही. नवीन प्रकल्प नाही. वाळू व्यावसायिकांना लाखो रुपयांचा दंड अशी स्थिती आहे. याउलट खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सत्तेत नसतानाही लोकांच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या हॉस्पिटलची उभारणी झाली आहे. 

जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रवेशातच अडकली असल्याची टीका त्यांनी केली. या संवाद यात्रेत आमदार विकासाची गाथा सांगून आपलीच पाठ थोपटून घेत आहेत. प्रत्यक्षात मतदारसंघाची गती शून्य आहे, असेही श्री. केणी यांनी स्पष्ट केले.

ताडपत्री विकण्याचा धंदा 
मतदारसंघात आमदार नाईक यांनी ताडपत्री उपलब्ध करून दिली. प्रत्यक्षात ज्या ताडपत्रीचा दर ३५० ते ४०० रुपये आहे ती ५०० रुपयांना विकण्याचा धंदा आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे, असा आरोप केणी यांनी केला. 

आमदारांच्या गॉगल गॅंगचे प्रताप 
आमदार नाईक यांच्या संवाद यात्रेत अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी न झालेल्या कामांचा जाब विचारला आहे. देवबाग येथे तर आमदार, खासदारांना पळ काढावा लागला. कोळंब येथील एका जेटीच्या कामात गॉगल गॅंगने ठेकेदाराकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी आमदारांसमोर केला. आमदारांच्या गॉगल गॅंगचे प्रताप समोर आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar keni comment on Vaibhav Naik Jansanwad Yatra