कोकणात आंबेवाल्यांच्या लेकी-सुना असे करतात कष्ट

कोकणात आंबेवाल्यांच्या लेकी-सुना असे करतात कष्ट

रत्नागिरी : आंबा व्यावसायिकांसाठी (Mango Commercial)पूर्ण वर्षभर कष्ट सुरू असतात. प्रक्रिया उद्योगात तीन महिने अहोरात्र काम चालते. अशा उद्योगांत आंबावाल्यांच्या लेकी-सुनाही कष्ट उपसत असतात. स्वयंपाकघरात अहोरात्र काम करणाऱ्या महिलेचे श्रममूल्य लक्षात घेतले जात नाही. तोच प्रकार या लेकी-सुनांबाबत होतो.

बदलत्या काळातही त्यांचे कष्ट आणि त्याचे वेगळे परिमाण दाखवणाऱ्या आपल्या आडनावापुढे ब्रदर्स, बंधू, सन्स (Brothers, Sons)असं लिहिलेले कित्येक उद्योग आपण बघतो- चितळे बंधू, देसाई बंधू, जोशी अँड सन्स वगैरे.. मुली सासरी जाणार आणि सासरच्यांना आवडेल ते करणार (नोकरी, व्यवसाय, गृहिणी) ही मानसिकता व वस्तुस्थिती दोन्ही आहेच. त्यामुळे पेंडसे भगिनी, (किंवा बंधूभगिनी) जोशी अँड डॉटर्स असं कुठे ऐकलंय का हो कुणी? मी तरी अपवाद म्हणून सुद्धा असं उदाहरण बघितलेलं नाही.

(mango-processing-industry-women-working-kokan-story)

वास्तविक आम्हा आंबेवाल्यांच्या घराघरांतून अगदी तीनचार वर्षांचे झाल्यापासूनच मुलामुलींना व्यावसायिक कामात सहभागी केलं जातं. जरा वाढल्यावर शाळा कॉलेजच्या सुटीच्या काळातच आंब्याच्या कामांची धामधूम असल्यामुळे बरोबर कामाच्या वेळेत घरातली मुलं कामाला उपलब्ध होतात. मे महिन्याच्या सुटीत उशिरा उठणे, फिरायला जाणे, पत्ते खेळणे हे आंबेवाल्यांच्या पोरांना कधी जन्मात ठाऊक नाही!

काळ पुढे सरकत जातो.. मुलंमुली हळूहळू एकेक जबाबदाऱ्या घ्यायला शिकतात. आणि अचानक लग्नाची वयं येऊन ठेपतात. २० किलोचा आंब्याने भरलेला क्रेट डोक्‍यावर घेण्यापासून ते समोरच्या पार्टीबरोबर/ ट्रान्सपोर्टवाल्याबरोबर फोनाफोनी करण्यापर्यंत.. आणि लादी पुसण्यापासून बॅंकेची कामे करण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या समान उचलणाऱ्या मुलगे व मुलींच्या वाटा इथे बदलायला लागतात.

पूर्वी मुलींना चॉईस नव्हता, किंवा चॉईस विचारला तरी अति अटी घालायची परवानगी नव्हती, तेव्हाच्याही आंबेवाल्यांच्या लेकी- शहरात सासरी राहून माहेरच्या आंब्यांची विक्री करताना दिसतात. गिरगावातील चाळीतल्या चिमुकल्या घरात माहेरहून आलेले गाडीभर आंबे विकणं ही काय गंमत नव्हे.. मुलांची सुट्टी संपण्यापूर्वी एकदा माहेरी जाऊन येऊ म्हणून पहाटे निघून दुपारला घरी पोचलेली माहेरवाशीण- घरामागच्या कारखान्यात ऐन रंगात आलेलं कॅनिंग आणि त्यात रंगलेले दादा, वहिनी बघून हातपाय धुवून ताबडतोब गॅसच्या शेगडीचा ताबा घेते, ती ह्याच संस्कारातून..

''हल्लीच्या मुलींमधून''- (बरेचदा शिवीसारखा वापरला जाणारा शब्द) एखादी मुलगी लग्न करताना जवळच्या शहरातील, नोकरी करणारा, आखीवरेखीव रुटीन असलेला, फ्लॅटमधला नवरा निवडते, त्यामागचं- आपला लहान भाऊ जाणता होऊन वडिलांच्या हाताशी येईपर्यंत दरवर्षी आंब्याच्या दिवसात माहेरी मदतीला जाता येईल, हे कारण असू शकतं. सासर माहेर जवळच्या अंतरात असल्यामुळे मुरंब्याची पूर्वतयारी सासरी करून माहेरी पाठवायची- मुरंबा तिकडे करतील. सासरी पिंप/क्रेट/ट्रे कमी पडतायत- माहेरहून आणायच. हेही प्रकार असतातच.

लग्न करून महानगरात गेलेल्या आंबेवाल्यांच्या लेकी- आंबे विकतात, हे तर अगदी कॉमन. पण परत जाणाऱ्या रिकाम्या ट्रकमधून काय काय परत पाठवलं जातं माहेरी? रिकाम्या बॉक्‍समधील उरलेला पेंढा- पुन्हा वापरायला होईल, आंबे संपले की तो पेंढा गुरं खातील, अगदीच काही नाही तर बंब पेटवायला होईल. तीच गत नारळाच्या करवंट्या व शेंड्यांची,हे संस्कार झिरपत येतात.

नातवंडं लाजत नाहीत..

माहेरचे आंबे उशिरा आले, तोपर्यंत दर कोसळले.. प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ नाही.. अशा स्थितीत एक आई आपल्या इंजिनियर मुलाला कामाला लावते आणि शहरातील मध्यवर्ती चौकात भाजीपाला फळे विकणाऱ्या खेडेगावातील लोकांच्या रांगेत बसून हा सुशिक्षित हॅंडसम पोरगा आजोळचे आंबे विकतो. आता सोशल मीडियावर घेतलेल्या ऑर्डरी बटणं दाबून मिळवल्या तरी कुरियर ऑफिसपर्यंत आंब्याची स्वतः हमाली करायलाही आंबेवाल्यांची नातवंडं लाजत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com