esakal | रत्नागिरीत ९२ वर्षांपूर्वी सामाजिक सीमोल्लंघन-अॅड. बाबा परुळेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Damodar Savkar

रत्नागिरीत ९२ वर्षांपूर्वी सामाजिक सीमोल्लंघन-अॅड. बाबा परुळेकर

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सुमारे १०० वर्षांपूर्वी रत्नागिरीत (Ratnagiri) राजकीय बंदिवासात (Political imprisonment) असणाऱ्या बॅरिस्टर वि. दा. सावरकर (Vinayak Damodar Savkar) यांनी त्या काळी सामाजिक क्रांती घडवली. तुम्ही, आम्ही सकल हिंदू असे म्हणत, त्यांनी जातीभेदाच्या भिंती तोडल्या. त्यांच्या अनेक समाजसुधारणांध्ये (Social reform) १२ ऑक्टोबर १९२९ रोजी म्हणजे विजयादशमीला (Vijayadashami) पूर्वास्पृश्यांसह सोने वाटपासाठी केलेला गृहप्रवेश कार्यक्रम म्हणजे सामाजिक सीमोल्लंघन ठरले. या कार्यक्रमाला मंगळवारी (ता. १२) ९२ वर्षे पूर्ण होत आहेत.

हेही वाचा: जुळ्या बहिणींची कमाल; १६ लढतीत १४ सुवर्ण कमाईने धमाल

याविषयी पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, बॅरिस्टर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यताविरोधी आंदोलनात १९२९ साली महत्त्वाचा टप्पा पार केला. सन १९२८ पर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी दसऱ्याला सोने द्यायचे कार्यक्रम केवळ सार्वजनिक ठिकाणीच केले जात. परंतु, केवळ सार्वजनिक व्यवहारातच नव्हे तर अगदी घराघरातूनही अस्पृश्यतेची दुष्ट भावना नष्ट करून सर्वमान्य नागरिकांचे घरातही पूर्वास्पृश्यांचे स्वागत व्हावे व त्यांना स्थान मिळावे, यासाठी दिनांक १२ ऑक्टोबरला विजयदशमीच्या दिवशी नियोजनपूर्वक कार्यक्रम आयोजित केले.

चार तासांत पूर्वास्पृश्यांचा सहभाग असलेल्या अखिल हिंदू मंडळाचे तीन समूह करून गावातील शक्य तेवढ्या घरांना भेटी दिल्या. या वेळी १८९ घरातील गृहस्थांनी पूर्वास्पृश्यांसह सर्वांना घरात घेऊन प्रेमाने सोने दिले घेतले. कित्येक ठिकाणी मिठाई वाटली. बैठकीवरच नव्हे तर त्यांना आग्रहाने घराच्या मजल्यावरील दिवाण दिवाणखान्यातही नेले. अधिकारी, प्रतिष्ठित, पुरातन अशा सर्व वर्गांच्या गृहस्थांनी हे स्वागत केल्याचे परुळेकर यांनी आवर्जून सांगितले.

३०-३५ घरांमध्ये या समूहाला प्रवेश दिला नसला तरीही त्या सर्वांनी घराचे दारात येऊन सोने दिले व घेतले. परिणामी स्पर्श बंदीचा प्रश्नच उरला नाही. ब्राह्मण वस्तीतून ८० टक्के घरांनी पूर्वास्पृश्यांना घरात घेतले. कुंभारवाड्यातील लोकांनीही 'हिंदू हिंदू बंधू बंधू' म्हणून सगळ्यांचे स्वागत केले. भेट देण्यात आलेल्या सर्व घरांची नावे सत्यशोधक साप्ताहिकातून प्रसिद्ध करण्यात आली. शेवटी "हिंदू धर्म की जय"च्या निनादात सरमिसळपणे विठोबा मंदिराच्या सभामंडपात जाऊन पूर्वास्पृश्यांसह सर्वांनी सोने वाहिल्याचेही अॅड. परुळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: खासदार राऊत भास्कर जाधवांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

कार्तिकीला गाभाऱ्यात टेकला माथा

कार्तिकी एकादशीला सार्वजनिक विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन स्पृश्यास्पृश्य यांसह सर्व नागरिक रथोत्सवाचे दिवशी प्रकटपणे देवापुढे माथा टेकून आले. या वेळचे वृत्तही सत्यशोधक आणि बलवंत या स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. रत्नागिरीकरांच्या या सक्रीय सहभागाबद्दल बॅरिस्टर सावरकरांनीही आनंद व्यक्त केला होता, असे परुळेकर यांनी सांगितले.

loading image
go to top