समुद्री कचरा बेततोय खलाशांच्या जीवावर

अर्जुन बापर्डेकर
Wednesday, 26 August 2020

भर समुद्रात इंजिन बंद पडल्याने लाटांमुळे होडी पलटी होऊन होडीतील खलाशी पाण्यात फेकले गेले

आचरा (सिंधुदुर्ग) : समुद्री पाण्यातील कचरा मच्छीमारांच्या जिवावर बेतत आहे. बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आसिफ मुजावर आणि इतर खलाशी मासेमारीसाठी समुद्रात जात असताना नस्ताजवळ होडीच्या इंजिनमध्ये कचरा अडकून इंजिन बंद पडले. भर समुद्रात इंजिन बंद पडल्याने लाटांमुळे होडी पलटी होऊन होडीतील खलाशी पाण्यात फेकले गेले. सुदैवाने किनारपट्टी पासून दिडशे फूटाच्या दरम्यान ही घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी सुखरूप आले. 

हेही वाचा - स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा...

नजरेच्या टप्प्यात असलेली होडी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने अडीज तीन तासांच्या अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. यात होडी आणि इंजिन यांचे मिळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आचरा समुद्रात बुधवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास आसिफ मुजावर, जहिर मुजावर हे तुलसी मामा, संदिप बा, राजकुमार मेन यांच्यासह आपली होडी (पात) घेऊन मासेमारीसाठी जात असताना नस्ताजवळ समुद्रातील प्लॅस्टीक कचरा होडीच्या इंजिन मध्ये अडकून इंजिन बंद पडले. 

नस्ताजवळील धोकादायक ठिकाणी होडी अडकल्याने समुद्राच्या लाटांच्या माऱ्याने होडी पलटी होऊन होडीवरील खलाशी पाण्यात फेकले गेले. किनारपट्टीपासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी पोहत सुखरूप किनाऱ्यावर आले. घटनेची खबर समजताच जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, पोलिस हवालदार अक्षय धेंडे, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांसह स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अडीज तीनतासांच्या अथक प्रयत्नाने स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने आसिफ मुजावर यांना होडी बाहेर काढण्यात यश आले. मात्र इंजिन आणि होडीचे मिळून सुमारे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -  ‘एक गाव एक गणपती’ च्या 48 वर्ष परंपरेच कोकणातील उर्सें गाव...

आचरा समुद्राचे नस्त धोकादायक

आचरा समुद्रात जिथे खाडी समुद्राला मिळते तो नस्ताचा भाग गाळाने भरून गेल्याने आधीच धोकादायक बनला आहे. आता खाडीच्या पाण्यातून येणारे प्लॅस्टीक आणि इतर कचरा यामुळे तो अधिकच धोकादायक बनला आहे. या कचऱ्यामुळे समुद्रातील जिवजंतूंनाही धोका निर्माण  झाला आहे. तसाच मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांनाही त्रासदायक बनला आहे. यामुळे समुद्रात येणारा हा कचरा भविष्यात मोठा त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रत्येकाने जागृत होणे आवश्यक बनले आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marine scrap dangerous to fishermen for fishing in the sea boat was destroyed