डोंगरावरचे पाणी घुसले घरात; .या शहरातील मार्कंडी, परशुरामनगर पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

महामार्ग विभागाला याबाबत जाबही विचारण्यात आले. तेव्हा डोंगरावरून येणारे पाणी महामार्गाच्या गटारात जाणार नाही, असे महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चिपळूण पालिकेसह शहरातील नागरिक, महामार्ग कृती समिती आक्रमक झाली.

चिपळूण ( रत्नागिरी ) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्यालगत गटार बांधणीचे काम सुरू आहे. या गटारांमध्ये डोंगरावरून येणारे पाणी न गेल्यास महामार्गालगतचा भाग नेहमीच पाण्याखाली राहण्याची शक्‍यता आहे. त्याची झलक दोन दिवसात झालेल्या पावसात पहायला मिळाली. या पावसात मार्कंडी, परशुराम नगर आणि महामार्गलगतचा भाग पाण्याखाली होता. येथील नागरिकांच्याही घरात पाणी शिरले होते. 

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चिपळूण शहरातून जातो. शहरातील महामार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मात्र रस्त्यालगत युटिलीटी डक आणि गटार बांधणीचे काम हाती घेतले आहे. गटाराचे बांधकाम रस्त्यापासून उंच करण्यात आल्यामुळे नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

महामार्ग विभागाला याबाबत जाबही विचारण्यात आले. तेव्हा डोंगरावरून येणारे पाणी महामार्गाच्या गटारात जाणार नाही, असे महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चिपळूण पालिकेसह शहरातील नागरिक, महामार्ग कृती समिती आक्रमक झाली.

डोंगरावरून येणारे पाणी महामार्गाच्या गटारात घेतले गेले नाही तर हे पाणी वाशिष्ठी तसेच शिवनदीत न जाता अडून राहील. महामार्गलगत असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी जाईल. ही वस्तूस्थिती महामार्ग विभागाचे अधिकारी आणि चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीसमोर मांडण्यात आली. महामार्गालगतचे गटार रस्त्यापासून अडीच फूट खोल आणि जमीनीला समतूल्य असावी, अशी मागणी केली होती. मात्र कंपनीने रस्त्यापासून दीड फूट खोल आणि जमिनीच्यावर दीड फूट उंच ठेवली आहे. त्यामुळे जागोजागी पणी साचण्याची शक्‍यता आहे.

पहिल्या पावसाळ्यात परशुराम नगर येथील दहा ते बारा घरात पावसाचे पाणी शिरले होते. मोठा पाऊस झाला तर महामार्गालगतच्या सर्वच घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्‍यता आहे. 

डोंगरावरून येणारे पाणी जाण्यासाठी काहीतरी पर्याय काढा किंवा महामार्गाच्या गटारांमध्ये हे पाणी घ्या नाही तर उंच भागातही पाणी साचणार हे आम्ही यापूर्वीपासूनच ओरडून सांगत होतो. त्याकडे लक्ष दिले गेले नाही. अजून वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकत्र मिळून राजकारण बाजूला ठेवून यावर पर्याय काढता येईल. नाहीतर दरवर्षी उंच भागात पाणी साचणार आहे. 
- शशिकांत मोदी, नगरसेवक, चिपळूण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markandi Parashuramnagar In Chiplun Under Rain Water Ratnagiri Marathi News