गणित बिघडले मासेमारीवर वादळाची वावटळ | Malvan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेमारीवर वादळाची वावटळ

मालवण : गणित बिघडले | मासेमारीवर वादळाची वावटळ

sakal_logo
By
- प्रशांत हिंदळेकर

मालवण : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश परिस्थिती आहे. परिणामी याचा मोठा फटका जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारीला बसला आहे. वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी करणे धोकादायक बनल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल सध्या थांबली असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या रापणकरांच्या जाळ्यात सध्या कमी दराची मासळी उपलब्ध होत असल्याने मच्छीमारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

दरम्यान, गेले काही दिवस समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. येत्या दोन दिवसांत समुद्रातील वातावरण निवळेल व पुन्हा मासेमारीस चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल, अशी अपेक्षा पारंपरिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: कचरा मुक्तीतून फुलली गच्चीवर बाग

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश परिस्थिती आहे. परिणामी गेले काही दिवस मासेमारी ठप्प झाली आहे. गेल्या व या महिन्याच्या सुरुवातीस मच्छीमारांच्या जाळ्यात किमती मासळीची चांगली कॅच मिळत होती; मात्र समुद्रातंर्गत बदलामुळे पुन्हा किमती मासळी मिळणे दुरापास्त बनले आहे. हवामान खात्याकडून मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याने अनेक मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीस जाणे टाळले आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित बंदरात ठेवल्या आहेत. मासेमारी हंगामात समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा मच्छीमारांना सामना करावा लागत आहे. चांगली मासळीची कॅच मिळत असताना अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरणाबरोबरच मुसळधार पावसाने शहर परिसरास झोडपून काढले. ऊन, पाऊस या बदलामुळे मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करणे अशक्य बनले आहे. चांगल्या मासळीच्या शोधासाठी मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागते; मात्र यात मासळी मिळेल याची शाश्‍वती नाही. शिवाय वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्रात मासेमारीस जाण्याचा धोका पत्करणे मच्छीमारांना शक्य नसल्याने अनेक मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळल्याचे चित्र किनारपट्टी भागात आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

गेल्या दोन महिन्यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या रापणकर मच्छीमारांच्या जाळ्यात चांगली मासळीचे उत्पन्न मिळत होते; मात्र वादळसदृश परिस्थितीमुळे रापण पद्धतीने मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. सध्या रापणकर मच्छीमारांच्या जाळ्यात टोकी तसेच अन्य किरकोळ प्रकारची मासळी मिळत आहे. या माशांना चांगला दर मिळत नसल्याने मच्छीमारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. येत्या दोन दिवसात समुद्रातील वातावरणात बदल होईल अशी अपेक्षा मच्छीमार बाळगून आहेत.

"यावर्षीच्या मासेमारी हंगामाची सुरुवात चांगली झाली होती; मात्र सातत्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने मासेमारीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मासळीची उलाढाल मंदावली असून, त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोकादायक असल्याने अनेक मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाण्याचे टाळले आहे. सद्यस्थितीत मासेमारीस मच्छीमार गेल्यास मासळी मिळेल, याची शाश्वती नसल्याने तोटा सहन करण्याची जोखीम पत्करण्यास मच्छीमार तयार नाहीत. येत्या दोन दिवसांत समुद्रातील वातावरण निवळेल, अशी अपेक्षा आहे."

- मिथुन मालंडकर, पारंपरिक मच्छीमार

loading image
go to top