‘मत्स्य सेतू अ‌ॅप’ वरदानच ; नविन-उद्योजकांना होणार फायदा

‘मत्स्य सेतू अ‌ॅप’ वरदानच ; नविन-उद्योजकांना  होणार फायदा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे ‘मत्स्य सेतू’ (Matsya Setu) हे अभिनव अ‌ॅप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग (Union Minister Giriraj Singh) यांच्या हस्ते नुकतेच सुरू झाले. मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध ऑनलाइन अभ्यासक्रम असणारे हे अ‌ॅप जिल्ह्यातील नव-उद्योजकांसाठी वरदान ठरेल, अशी माहिती भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर (Avinash Paradkar) यांनी दिली.

matsya-setu-app-start-in-today-information-by-bjp-social-media-district-president-avinash-paradkar-kokan-marathi-news

पराडकर म्हणाले, ‘‘आयसीएआर, सीआयएफए भुवनेश्वर यांसारख्या गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाद्वारे उपजीविकेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधन संस्था आणि राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड, हैदराबाद यांच्याकडून हे अ‌ॅप विकसित केले आहे. या माध्यमातून ऑनलाईन कोर्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांची क्षमता वाढविणे हा देशातील तंत्रज्ञानाद्वारे अग्रगण्य मत्स्यपालन विकासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मत्स्य शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या युवावर्गाला योग्य प्रशिक्षण घेण्यासाठी हालचाल करणे अवघड झाले होते. हे नवे मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यासाठी संशोधन संस्थांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. या परिस्थितीचा विचार करून मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राचे पुढचे पाऊल म्हणून ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहेत. अद्ययावत प्रशिक्षणासाठी मत्स्य सेतू अ‌ॅप तयार करणे ही काळाची गरज बनली होती. त्यानुसार बनवलेले हे ‘मत्स्य सेतू अ‌ॅप’ निश्चितच तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्यास आणि त्यांच्या सोयीनुसार व्यवस्थापनाची योग्य पद्धत राबवण्यासाठी मत्स्य उत्पादकांना नक्कीच मदत करेल.

ऑनलाईन कोर्स सुरू करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट हे देशातील मत्स्यपालक शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे आणि त्याचा प्रसार करणे हा आहे. शेतकऱ्यांसाठी मत्स्य पालनाचे माशांच्या प्रजातीनिहाय व विषयनिहाय स्वयं-अध्ययन ऑनलाइन कोर्स यामध्ये आहेत. मत्स्यपालन तज्ज्ञ, कार्प, कॅटफिश, स्कॅम्पी यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या माशांची पैदास, बियाणे उत्पादन आणि वाढ यावर मूलभूत संकल्पना आणि व्यावहारिक प्रात्यक्षिके दिली जातात.

मरळ, शोभेचे मासे, मोत्याची शेती यात माती परीक्षण, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी, माती आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींचे पालन करण्यासाठी, जलचर क्षेत्रात अन्न आणि आरोग्य व्यवस्थापन हे विषय देखील या कोर्सेसमध्ये समाविष्ट केले आहेत. परिपूर्ण विषयानुरूप शिक्षण सामग्रीसह प्रशिक्षणार्थीच्या सोयीसाठी विभागांना लहान लहान व्हिडिओमध्ये विभागले गेले आहे. स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी चाचणी पर्याय देखील अ‌ॅपमध्ये उपलब्ध केले गेले आहेत. शेतकऱ्यांना मत्स्य सेतू अ‌ॅपवरील प्रत्येक अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण झाल्यावर ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. या अ‌ॅपद्वारे शेतकरी शंका देखील उपस्थित करू शकतात आणि तज्ञांकडून विशिष्ट सल्ला मिळवू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य क्षेत्रात वीस हजार कोटीहुन अधिक रुपयांची तरतूद असणारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएसवाय) सुरू केली आहे. सिंधुदुर्ग कमळ प्रतिष्ठानतर्फे ही योजना यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील काही उद्योजकांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांचे प्रकल्पही सुरू झाले आहेत.

- अविनाश पराडकर, जिल्हाध्यक्ष, भाजप सोशल मीडिया

रोजगार निर्मिती शक्य

पराडकर म्हणाले, की ‘पीएमएसवाय’ योजनेअंतर्गत देशपातळीवर ७० लाख टन मत्स्य उत्पादनाचे ध्येय निश्चित केले आहे. मत्स्य व्यवसायात पाच वर्षांत ५५ लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याचा केंद्राचा विचार आहे. कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांच्याकडे नुकतेच मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिल्ह्यात रोजगाराचे नवे दालन निश्चितपणे उघडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com