esakal | भ्रष्टाचारी कोण, हे जनतेने ओळखावे; संजू परब यांच्यावर टिकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar Opponents Target In DPDC Meeting Sindhudurg Marathi News

भ्रष्टाचारी कोण, हे जनतेने ओळखावे; संजू परब यांच्यावर टिकास्त्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरातील उद्यान आणि हेल्थ पार्कमध्ये भ्रष्टाचार केल्याचा नगराध्यक्ष संजू परब (sanju parab) यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पैसे खाण्याची सवय आम्हाला नाही. भ्रष्टाचार कोण करत ते जनतेने ओळखावे, अशी टीका माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केली. (deepak-kesarkar-criticism-sanju-parab-political-marathi-kokan-news)

काल नगराध्यक्षांनी एमटीडीसीच्या विकासकामांबाबत केलेल्या आरोपांना आज केसरकरांनी प्रत्युत्तर दिले. येथील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका लोबो, अशोक दळवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, `` त्यांच्या आरोपाबाबत आमची कोणाकडेही तक्रार करावी. भोसले उद्यान कंपाऊंड, काजी शहाबुद्दीन हॉल याला मंजुरी बबन साळगावकर यांच्या कारकीर्दीत दिली होती; मात्र त्याचे उद्‍घाटन परब यांनी केले. प्रत्येक गोष्टीला पैसे मीच दिले आहेत. तुम्ही किती लोकांना सांगितले पैसे मी दिले म्हणून? एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचे चुकले की केसरकर यांचे नाव घ्यायचे हे सहन केले जाणार नाही. शहरात विकासासाठी नेहमी काम करणार आहे. सावंतवाडी शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासोबत भ्रष्टाचार मुक्त राहणे गरजेचे आहे.`

ते म्हणाले, `एमटीडीसी ही स्वायत्त संस्था आहे. एमटीडीसी कॉन्ट्रॅक्टर नेमून देते. त्यांना काम दिल्यानंतर ते योग्यरित्या होते की नाही, हे पाहणे त्या भागातील पालिकेची जबाबदारी आहे. कोण पैसे खाते, याबद्दल बाजारात काय चर्चा सुरु आहे, याची परब यांनी माहिती करून घ्यावी. गेल्या दीड वर्षात उद्यानाचे चाललेले काम का नाही पाहिले? पालिकेची देखील जबाबदारी आहे. ज्यावेळी खेळणी ताब्यात घ्यायची वेळ आली, त्यावेळी तुम्हाला सुचल नाही का? तुम्ही त्यावेळी गप्प का राहिला? एमटीडीसीवर आरोप का केला नाही? हेल्थ पार्कमध्ये एसी पडून आहेत. ते लावून घ्या. शहरातील हे काम पालिका करू शकत नाही का? ही जबाबदारी पालिकेची नाही?

माजी नगराध्यक्ष बबन साळगावर यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून साळगावकर हे भ्रष्टाचार करू शकतात का? साळगावकर यांच्याकडे स्वतःचे ऑफिस, गाडी सुद्धा नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कोण करत ते जनतेने ओळखावे.` लोबो म्हणाल्या, ``शहरात वॉटर एटीएममध्ये ९ लाखाचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे. केसरकर यांचे नाव घेतल्याशिवाय वरच्या लेव्हलवर परब यांचे स्वतःचे अस्तित्व टिकणार नाही. यासाठीच ते नाव घेत आहेत.

हेही वाचा- राणेंना पद; पण शिवसेनेला बळ

वादळाची पूर्वकल्पना असूनही दुर्लक्ष

केसरकर म्हणाले, ‘‘विकासकामांसाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी पैसे पालिकेला देऊनही पालिकेने अजूनही जमिनी ताब्यात घेतल्या नाहीत. आठवडाभर ‘तौक्ते’ची पूर्वकल्पना देऊनही सावंतवाडीतील नाट्यगृहाचे छप्पर उघडे होते. यावर प्लास्टिक घालून पाण्याला वाट केली असती तर फर्निचर खराब झाले नसते. हे सभागृह आता वर्षभर बंद राहणार आहे. त्याचे पालिकेला मिळणारे भाडे फुकट जाणार. याला संजू परब व मुख्याधिकारी जबाबदार आहेत.``

loading image