मनसेच्या नगराध्यक्षांना दिली साथ ; सेनेच्या भूमिकेची जोरदार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

नगराध्यक्ष खेडेकर यांना साथ देत पालिका प्रशासनावर ताशेरे ओढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेत डिझेल घोटाळा झाला की नाही ते अजून सिद्ध व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या सभेत डिझेल घोटाळ्याबाबत अन्य नगरसेवकांनी मौन बाळगले आणि शिवसेनेचे माजी गटनेते बाळा खेडेकर यांनी नगराध्यक्ष खेडेकर यांना साथ देत पालिका प्रशासनावर ताशेरे ओढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

खेड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिझेल घोटाळ्याचा विषय असल्याने उत्सकुता होती. मात्र मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना शिवसेनेने साथ दिल्याने ही सभा वाजलीच नाही. उलट शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे माजी गटनेते बाळा खेडेकर यांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना या डिझेल घोटाळ्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. पालिकेत असा घोटाळा जर झाला असेल तर पालिकेतील बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या वेळेलाच त्यातील चुका निदर्शनास का आणून दिल्या नाहीत, असा मुद्दा उपस्थित केला. 

हेही वाचा - महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ देणार ; वीज बिलावरुन नितेश राणे आक्रमक -

बिले तपासण्याचे काम अधिकारी करतात. ती बिले नियमानुसार आहेत की नाहीत हे पाहणेही त्यांचे काम असते. शिवाय दरवर्षी पालिकेत लेखापरीक्षण होते. त्यात हा घोटाळा उघड व्हायला हवा होता. पण तसे निदर्शनास आलेले नाही. कोणीतरी नागरिकांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली म्हणून हा घोटाळा झाला म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले काम चोख केले पाहिजे. नगरसेवकांनी सभागृहात फक्त गोंधळ घालायचा काय? 

सर्वसाधारण सभेत नगरसेवक बाळा खेडेकर यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. त्यांच्या बोलण्याने सभागृहात शांतता पसरली होती. गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी चर्चेत भाग घेतला. विषय पत्रिकेवरील 27 विषयांवर चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, अल्पिका पाटणे, सीमा वंडकर हे सदस्य अनुपस्थित होते. 

नगराध्यक्षांनी वडकेंना परवानगी नाकारली 

सभा सुरू झाल्यानंतर माजी बांधकाम सभापती नम्रता वडके सभागृहात उशिरा परवानगी न घेता आत आल्या आणि त्यांनी चर्चेत भाग घेण्यास सुरवात केली. त्यावेळी नगराध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. सभागृहाचे नियम पाळा, असे नगराध्यक्षांनी वडके यांना सुनावले.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor of manase stand with shiv sena in khed ratnagiri on the topic of diesel