esakal | महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ देणार ; वीज बिलावरुन नितेश राणे आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane criticized on the topic of electricity bill in kankavli sindhudurg

तर आमचे कार्यकर्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ देणार ; वीज बिलावरुन नितेश राणे आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : मायकल जॅक्‍सनच्या शो ची करमाफी ठाकरे सरकार देते. तर मग सामान्य नागरिकांना वीज बिलमाफी का देत नाही? असा संतप्त प्रश्‍न आमदार नीतेश राणे यांनी आज उपस्थित केला. तसेच सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी बांधवांना दमदाटी करून वीज पुरवठा तोडाल तर आमचे कार्यकर्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष दालनात नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक बाबू गायकवाड, ॲड. विराज भोसले, किशोर राणे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘‘वीज माफीच्या मुद्दयावरून राज्य सरकारने घुमजाव केले. त्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवाची वीज तोडली जात आहे; मात्र सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या अधिकाऱ्यांना कसा शॉक द्यायचे ते आमच्या कार्यकर्त्यांना पक्‍के ठाऊक आहे. दरम्यान, ‘मला विचारल्याशिवाय वीज तोडणी करायची नाही’ असा डायलॉग नुकताच पालकमंत्र्यांनी मारला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या या डायलॉगला महावितरणने भीक घातलेली नाही. पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर देखील थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.’’

हेही वाचा - सावधान : रोहा ते रत्नागिरी मार्गावरील गावांना कोकण रेल्वेचा सर्तकतेचा इशारा

येत्या १ मार्चला राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार आहे. ठाकरे सरकारमधील अनेक कॅबिनेट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याचे समोर येत आहे. मागील दीड वर्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणारे आरोग्यमंत्री टोपे आता कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. निवडणूक प्रचारात आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील कोविड पॉझिटिव्ह आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ सुद्धा आज कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातही नवीन राजकीय कोरोना सुरू झालाय का? याची तपासणी करण्याची मागणी डब्ल्यू.एच.ओ.कडे करणार असल्याची टीकाही आमदार राणे यांनी केली.

संपादन - स्नेहल कदम