सावंतवाडी नगराध्यक्षांचा `मल्टीस्पेशालिटी`बाबत इशारा..`या` मागण्या

Mayor sanju parab press conference sawantwadi sindhudurg
Mayor sanju parab press conference sawantwadi sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - स्थानिक आमदारांना डावलून खासदार विनायक राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर नेऊन दीपक केसरकर यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु याचा गंधही नसणारे केसरकर आजही हॉस्पिटल शहरात होणार, असे सांगत आहेत; मात्र दोघांनी एकत्र बसून हे हॉस्पिटल शहरात व्हावे, यासाठी एकमत करावे. ते शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्यास पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. 

नगराध्यक्ष परब यांनी पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवरून शिवसेनेवय टीका केली. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, भाजप शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, मोहिनी मडगावकर, बेला पिंटो आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्ष परब म्हणाले, ""शहरामध्ये श्री. केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्यासाठी तीस कोटी रुपये मंजूर केले होते. श्री. केसरकर यांनी या हॉस्पिटलचे भूमिपूजनही केले; मात्र अद्यापपर्यंत त्याठिकाणी पायाही रचला गेला नसल्याने हे हॉस्पिटल आज खासदार राऊत, पालकमंत्री उदय सामंत व शिवसैनिक शहराबाहेर वेत्ये याठिकाणी नेण्याच्या प्रयत्न करत आहेत. तेथे जागा पाहून तसे त्यांनी जाहीर केले आहे; मात्र या संदर्भात गंधही नसलेले आमदार केसरकर हे हॉस्पिटल सावंतवाडीतच होणार असे सांगत आहेत.

एकूणच केसरकरांचे मतदारसंघावर असलेले वर्चस्व कमी करण्याचे हे काम खासदार करत आहेत. आज वेत्ये येथे हॉस्पिटल व्हावे, यासाठी गावागावात फिरुन शिवसैनिक ग्रामपंचायतीच्या पाठिंब्याचे दाखले खासदारांना देत आहेत. यातूनच जनता ही त्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत नाही; मात्र सावंतवाडी शहराचा विचार करता आधीच हायवे शहराबाहेरून गेल्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मंजूर होऊन भूमिपूजन झाले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर गेल्यास पुन्हा एकदा शहराचे मोठे नुकसान होणार आहे.

वेत्ये गावाशी माझी दुश्‍मनी नाही किंवा माझ्यासाठी गाव वाईट नाही; मात्र शहरातील पायाभूत सुविधा लक्षात घेता त्या सुविधा वेत्ये येथे नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलच्या जागेवरून खासदार राऊत व आमदार केसरकर यांनी मतदारसंघांमध्ये वाद निर्माण न करता एकत्र बसून हे हॉस्पिटल सावंतवाडी शहरात उभे राहावे यासाठी एकमत करावे. शहरातील जागेवरून राजघराण्याने स्वतःहून आपली सहमती दर्शवली आहे. त्यासाठी राजघराण्याचा मी आभारी आहे; मात्र आता आमदार व खासदार यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.'' 

पाणमांजरांचे संवर्धन करू 
ते पुढे म्हणाले, ""शहरातील मोती तलावामध्ये दुर्मीळ होत असणारे पाणमांजरे स्थिरावली आहेत. शहराच्या व पर्यटनाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी पालिका पुढाकार घेणार असून, यासाठीच्या आवश्‍यक गोष्टींसाठी लवकरच वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी बोलून तशी सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अद्यापही आढळून येत असताना खबरदारी म्हणून शहरात परदेशी व्यक्ती आल्यास त्याला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

आज भाजपची व्हर्च्युअल सभा 
ते म्हणाले, ""पालिकेच्या पाळणेकोंड धरणावर मद्यपींकडून दारूच्या पार्ट्या होतात, असे निदर्शनास आले आहे. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य गेट बंद असताना ना मद्यपी वनविभागाच्या हद्दीतून चोरट्या वाटेने आत प्रवेश करत आहेत. याबाबत दखल घेऊन तशी तक्रार पोलिस निरीक्षकांजवळ केली आहे. लवकरच याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. भाजपाच्या वतीने उद्या (ता.28) सायंकाळी सहा वाजता व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले असून, यामध्ये कोरोनाविषयी माहिती देण्यात येणार आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com