सावंतवाडीत भाजी विक्रेत्यांचीही वैद्यकीय तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

भाजी विक्रेते हे परराज्यातून भाजी आणत असल्याने त्यापासून दक्षता घेण्यासाठी या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, या हेतूने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील त्यांची नेमणूक केली आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता यावी, यासाठी शहरात पालिकेच्या वतीने वॉर्डनिहाय भाजी विक्री केंद्रे सुरू केली आहे; मात्र भाजी विक्रेते हे परराज्यातून भाजी आणत असल्याने त्यापासून दक्षता घेण्यासाठी या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, या हेतूने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील त्यांची नेमणूक केली आहे.

येथील पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांच्या सहकार्याने ही वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्याधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर संतोष जिरगे यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत. 

भाजीविक्रेत्यांबरोबरच किराणा, दूध व अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही जिरगे यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सावंतवाडीतील नागरिकांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पालिकेने वॉर्डनिहाय भाजी विक्री केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी विक्रेत्यांना परवाने दिले असून त्यांची ठराविक जागावर नेमणूक केली आहे; मात्र विक्रेते हे परत जिल्ह्यातून व परराज्यातून येणारी भाजी विक्री करत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे.

त्याचप्रमाणे किराणा, भाजी, दूध घरपोच करणाऱ्या काही लोकांना अत्यावश्‍यक सेवा म्हणून पास देण्यात आले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उमेश मसुरकर यांच्या सहकार्याने ही तपासणी त्वरित पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्याधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर संतोष जिरगे यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Examination Of Vegetable Vendors In Sawantwadi