वैद्यकीय महाविद्यालय आता रत्नागिरीतही : उद्धव ठाकरे

राजेश कळंबटे
Sunday, 18 October 2020

सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यावर ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्‍वासन दिले.

 रत्नागिरी : रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सरकार सकारात्मक आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले, तसे ते रत्नागिरीतही देऊ. त्यासाठी आवश्‍यक सर्व अटींची पूर्तता करा. 20 दिवसांत परवानगी देतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यावर ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा - कोकणात घरात सापडली दहा किलो वजनाची घोरपड -

येथील शासकीय रुग्णालयातील ऑनलाईन प्लाझ्मा थेरेपी सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीकरांना दसऱ्याची भेट म्हणून वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे जाहीर केले. ते म्हणाले, की माझ्याकडे कौतुकाचे, अभिनंदनाचे शब्द कानावर येतात. त्यामागे आपण केलेली मागणी असते, हे माझ्या लक्षात आहे. त्यानुसारच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आम्ही सकारात्मक आहोत. 

तत्पूर्वी, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव आहे, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला तत्काळ मान्यता मिळेल. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी, तर सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांनी शासन निर्णयासाठी आग्रही राहून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली. त्याप्रमाणे येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी रत्नागिरीत 20 एकर जागा शोधून ठेवा. सगळी पूर्वतयारी करा. मी शासन निर्णय काढायला तयार आहे. 'आयसीएमआर'च्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाला मायक्रोबायोलॉजी लॅब लागते. ती शासकीय रुग्णालयात नाही. त्यासाठी काम करून घ्यावे. 

हेही वाचा -  भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर सापडलेल्या दोन वर्षाच्या खवल्या मांजराला मिळाले जीवदान -

वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, की वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचा शासन निर्णय महिनाभरात काढता येऊ शकतो. मुख्यमंत्री यांनी तर 20 दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. मान्यतेसाठी 300 बेडस्‌ आवश्‍यक असतात. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात 300 बेडस्‌, मनोरुग्णालयात 100, तर महिला रुग्णालयात 250 बेडस्‌ उपलब्ध आहेत. त्यामुळे याला मान्यता देण्यात अडचण येणार नाही. महाविद्यालयासाठी लागणारी इमारत कोठे बांधायची, याबाबत निर्णय नंतर घेता येऊ शकतो. सिंधुदुर्गचे महाविद्यालय हे बृहत्‌ आराखड्यात होते. रत्नागिरीतील महाविद्यालयासाठी राज्याकडून आवश्‍यक निधीची तरतूद करता येऊ शकते. 

आघाडी सरकार शब्द पाळते 

महाविकास आघाडी सरकार दिलेला शब्द पाळते, हे रत्नागिरीत सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या प्लाझ्मा सेंटरच्या निमित्ताने आम्ही दाखवून दिले आहे. दुसरे केंद्र सिंधुदुर्गमध्ये सुरू केले जाईल, असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी व्यक्‍त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical hospital also launched in ratnagiri district said CM uddhv thakrye in online inauguration