चिरेखाण व्यावसायिक एकवटले 

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 18 October 2020

अल्प मुदतीचा परवाना बंद करण्याचा शासन निर्णय झाल्याने यापूर्वी अल्प मुदतीत व्यवसाय करणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकांपुढे शासनाच्या जाचक अटींचे मोठे आव्हान आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील पारंपरिक व्यवसायातील हजारो कुंटुबांना रोजगार देणारा चिरेखाण व्यवसाय गेले काही वर्षे शासनाच्या जाचक अटीत अडकला आहे. व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू राहण्यासाठी पक्षविरहीत जिल्हा चिरेखाण संघटनेची स्थापना चौके भराडी देवी मंदिरात घेतलेल्या बैठकीत करण्यात आली. 

अल्प मुदतीचा परवाना बंद करण्याचा शासन निर्णय झाल्याने यापूर्वी अल्प मुदतीत व्यवसाय करणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकांपुढे शासनाच्या जाचक अटींचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय बंद झाला तर शेकडो चिरेखाण व्यावसायिक संकटात येतील. तसेच या व्यवसायावर अवलंबून असणारे गवंडी, कामगार, डंपर मालक आदींवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करून पूर्वीप्रमाणेच परवाना द्यावा, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करून हा पारंपरिक चिरेबंदी घर बांधण्यासाठी उपयुक्त व्यवसाय सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक चिरेखाण व्यावसायिक आज एकवटले. 

या जिल्हास्तरीय बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील ज्येष्ठ व तरुण शंभराहून अधिक चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला प्रत्येक तालुक्‍यात एक बैठक घेऊन चिरेखाण व्यवसायासंबधी चर्चा करण्याचे तसेच व्यवसायातील भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्याचे काम नि:पक्षपातीपणे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. या चौके चिरेखाण संघटनेने ही बैठक बोलाविली होती. 

कार्यकारणी स्थापन 
या वेळी नविन जिल्हा संघटना कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यात अध्यक्ष प्रमोद कांबळी (कणकवली), सचिव मिलिंद साटम (देवगड), उपाध्यक्ष बिजेंद्र गावडे (चौके), अमित साटम (देवगड), महादेव पारकर (असरोंडी), मदन सातोसकर (सावंतवाडी), खजिनदार दत्ता गावडे (चौके ), सल्लागार संतोष गावडे (चौके) यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Chire miners at Chowke