गुपचुप गावात याल तर सावधान! दोडामार्गावसीयांनी काय घेतलाय निर्णय?

प्रभाकर धुरी
Sunday, 19 July 2020

व्यापाऱ्यांनी जर गणेश चतुर्थी सणात लागणारे साहित्य ग्राहकांना घरपोच दिले तर होणारी गर्दी टळू शकते, असा मुद्दा तहसीलदार श्री. कर्पे यांनी मांडला. 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात गणेश चतुर्थीला गावात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्‍वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचाच राहणार आहे. गोव्यातून गुपचूप गावात येणाऱ्या लोकांवर कारवाई होणार असल्याचे काल (ता.17) येथील संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले. गोवा राज्यातून तालुक्‍यात येणाऱ्या नोकरदारांनाही अधिकृत पास घेऊनच यावे लागेल आणि त्यांनाही 14 दिवसांचा क्‍वारंटाईनचा नियम लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

तालुक्‍यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींची गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवरील नियोजनासाठी येथील महालक्ष्मी सभागृहात प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, पंचायत समिती उपसभापती धनश्री गवस, सदस्य बाबूराव धुरी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर, पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. 

गणेश चतुर्थी कोकणातील मोठा सण असल्याने या सणाला मोठ्या संख्येने मुंबई-पुण्याहून चाकरमानी गावोगावी दाखल होतात. त्यांना 7 दिवस की 14 दिवस क्‍वारंटाईन करायचे याबाबत अनेक मतप्रवाह होते. त्यामुळे चाकरमान्यांचे क्‍वारंटाईन 14 दिवसांचेच राहील, असे ठरविण्यात आले. ज्या चाकरमान्यांना होम क्‍वारंटाईन करणे सुरक्षेच्या दृष्टीने शक्‍य असेल अशांचे होम क्‍वारंटाईन करावे व ज्या चाकरमान्यांचे होम क्‍वारंटाईन शक्‍य नसेल त्यांचे गावातच संस्थात्मक क्‍वारंटाईन करावे, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या. 

तालुक्‍यातील एका ग्रामसेवकाच्या हाती दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी लक्ष ठेवणे कठीण असल्यामुळे त्यांच्या मदतीला कृषी सहायकासह अन्य शासकीय कर्मचारी देण्यात येतील, असे श्री. धुरी यांनी सांगितले. तलाठ्यांनीही कार्य सेवाक्षेत्रातील गावात हजर राहून सरपंचांना सहकार्य करावे, असे सांगून श्री. धुरी यांनी गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्याची संख्या जास्त असल्याने प्रत्येक सरपंचानी गावात स्वयंसेवकांची टीम तयार करावी, असे सुचविले. व्यापाऱ्यांनी जर गणेश चतुर्थी सणात लागणारे साहित्य ग्राहकांना घरपोच दिले तर होणारी गर्दी टळू शकते, असा मुद्दा तहसीलदार श्री. कर्पे यांनी मांडला. 

गोव्यातून येणाऱ्यांना क्‍वारंटाईन करा 
तालुक्‍यातील अनेक शासकीय कार्यालये, खासगी व्यवस्थापने, दुकाने येथे अनेकजण गोव्यातून ये-जा करुन काम करतात. त्यांच्यामुळेही कोरोना संसर्ग होवू शकतो. त्यामुळे त्यांना तालुक्‍यात वास्तव्य करण्याच्या सूचना द्याव्यात. त्यांना प्रत्येकवेळी 14 दिवस क्‍वारंटाईन करावे, अशी मागणीही होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meeting of dodamarg residents because coronavirus impact konkan sindhudurg